होळीत कोणतंही झाड जाळू नका, मनातून अंधश्रद्धा दूर करा : सयाजी शिंदे

पुण्याच्या कात्रज बोगद्याजवळ डोंगरावरील झाडांना आग लागल्याचे दिसताच सयाजी शिंदे आणि त्यांचे सहकाऱ्यांनी ती विझवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

फोटो सौजन्य: सयाजी शिंदे फेसबुक पेज

होळीच्या सणाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे झाडं जाळू नका. झाड जाळल्यामुळं अमूक-तमूक होतं ही अंधश्रद्धा पहिल्यांदा मनातून काढून टाका, असे आवाहन प्रसिद्ध सिनेअभिनेते आणि पर्यावरण कार्यकर्ते सयाजी शिंदे यांनी लोकांना केलं आहे.

पुण्याजवळ कात्रज बोगद्याजवळ डोंगरावरील झाडांना आग लागल्याचे दिसताच सयाजी शिंदे आणि त्यांचे सहकारी कारने तिथून जात असताना थांबले आणि त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना सयाजी शिंदे यांनी लोकांना हे आवाहन केले आहे.

सयाजी शिंदे म्हणाले, “मी आज (रविवार) दुपारच्या सुमारास पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने एका कार्यक्रमासाठी जात होतो. माझी गाडी कात्रज बोगद्याजवळ आली तेव्हा मला डोंगराच्या एका बाजूला आग लागल्याचे दिसले. तेव्हा मी ड्राईव्हरला गाडी बाजूला घेण्यास सांगितलं आणि माझ्या सात ते आठ सहकाऱ्यांसह आग लागलेल्या ठिकाणी पोहचलो. तिथे गेल्यावर पाहिले तर जवळपास अर्ध्या एकर भागात आग लागल्याचे चित्र होते. आम्ही सर्वांनी मिळून ही आग विझवली. तासाभराच्या प्रयत्नांनंतर ही आग विझली. दरम्यान मला खूपच राग आला होता. कारण, रस्त्याने येणार्‍या जाणार्‍यांना आग लागल्याचे दिसत होते मात्र कोणीही ती विझवण्यासाठी थांबले नाहीत. ज्या निसर्गापासून आपल्याला मोकळा श्वास घेता येतो. त्याकडे कोणीही पाहत नाही, केवळ गाडीतून किती आग लागली आहे. हे पाहण्याखेरीज कोणीही काही करीत नव्हते. त्यामुळे अशा घटना पाहिल्यावर तरी आग विझविण्याचे प्रयत्न करावा,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

होळीच्या दिवशी कोणतेही झाड जाळू नका

“होळीच्या सणानिमित्त झाडांच्या फांद्या जळाल्याने अमुक होते, तमूक होते अशा प्रकारच्या अंधश्रद्धा मनातून अगोदर काढा आणि आपली निसर्गाची खरी संपत्ती कशी वाढेल यावर लक्ष केंद्रीत करा” असा संदेशही त्यांनी यावेळी लोकांना दिला. उद्याच्या होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर या दिवशी कोणत्याही प्रकारची झाडं जाळू नका, असे आवाहनही त्यांनी केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Do not burn any tree on holi day remove superstition from the mind says sayaji shinde svk