पिंपरी : प्रेम प्रकरणातून एक महिला आणि पुरुषाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना तळवडे येथे बुधवारी पहाटे घडली. याप्रकरणी ठेकेदार असलेल्या महिलेच्या दुसऱ्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने खुनाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खून झालेली महिला आणि पुरुष हे तळवडे परिसरात झोपडीवजा घरात वास्तव्यास होते. दोघेही मजुरीचे काम करीत होते. तर, ज्याने खून केला तो मजुर पुरविण्याचे कंत्राट घेतो. महिलेचे खून झालेल्या आणि खून केलेल्या दोघांशीही विवाहबाह्य संबंध होते. महिलेचे खून झालेल्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती दुसऱ्या प्रियकराला मिळाली. त्याला त्याचा राग आला. त्यातून त्याने बुधवारी महिलेचा आणि तिच्या प्रियकराचा दगडाने ठेचून खून केला.
खून केल्यानंतर दोघांचेही मृतदेह मोकळ्या मैदानात दहा फुट अंतरावर टाकले. याबाबत माहिती मिळताच देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तपासात दोघांचाही खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ठेकेदार असलेल्या दुसऱ्या प्रियकराला ताब्यात घेतले असून त्याने खुनाची कबुली दिली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.