पुणे : ‘कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) उत्पादनादरम्यान तयार होणारी जैविक खते साखर उद्योग आणि कृषी क्षेत्रासाठी आमूलाग्र बदल करणारी ठरतील,’ असे मत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे तज्ज्ञ सल्लागार डॉ. एस. व्ही. पाटील यांनी व्यक्त केले.दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या (डीएसटीए) वतीने आयोजित ‘नवऊर्जा, नवभविष्य : भविष्यातील साखर उद्योग रचना’ चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्राला महाराष्ट्रासह गुजरातमधून साखर कारखाना प्रतिनिधी उपस्थित होते.
चर्चासत्राच्या उद्घाटन सत्रात ‘डीएसटीए’चे अध्यक्ष एस. बी. भड यांनी साखर उद्योगातील ऊर्जा बचतीचे महत्त्व मांडले. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष (तंत्र) बोखारे, व्ही. एम. कुलकर्णी, राज प्रोसेसचे अनिलराज पिसे आदी उपस्थित होते. ‘सीबीजी उत्पादनादरम्यान, ‘एसएफओएम’ हे जैविक खत बाहेर पडते. हा उपपदार्थ भविष्यात भारतीय साखर उद्योग आणि शेतीसाठी फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे पीक उत्पादनामध्ये २० टक्के वाढ होईल आणि सध्याच्या रासायनिक खतांची गरज २५ टक्क्यांनी कमी होईल,’ असे पाटील यांनी सांगितले.