पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. श्याम मुडे यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. मुडे हे फर्ग्युसनचे १८ वे प्राचार्य ठरले आहेत.
डॉ. मुडे यांनी भूगर्भशास्त्र या विषयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून पी.एचडी. प्राप्त केली आहे. सन २०२२ पासून ते फर्ग्युसनच्या भूगर्भशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. शिक्षण, संशोधन आणि अध्यापनाच्या माध्यमातून भूगर्भशास्त्र या विषयात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संशोधनपत्रिकांमध्ये त्यांचे पन्नासहून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांना आयएनएसए सायंटिस्ट आणि शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
जागतिक शिक्षण आणि उद्योगांच्या मागणीनुसार कौशल्याधारित अभ्यासक्रम, भारतीय ज्ञान प्रणालीचे सक्षमीकरण, जगभरातील विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक आणि उच्च गुणवत्तेचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी कार्यरत राहणार असल्याची भावना डॉ. मुडे यांनी व्यक्त केली.