पुणे : अमली पदार्थ तस्करीचे आंतरराष्ट्रीय जाळे उघडकीस आणून पुणे पोलिसांनी आतापर्यंत तीन हजार ७०० काेटी रुपयांचे मेफेड्राॅन जप्त केले आहे. या प्रकरणात पुण्यातील एमडीचा पुरवठा करणारा आराेपी हैदर शेख याचा मेहुणा शाेएब सईद शेख (रा. काेंढवा) यास पाेलिसांनी अटक केली आहे. शाेएब याने कुरकुंभ येथील भीमाजी साबळे याच्या कारखान्यातून टेम्पाेत काेट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ भरुन रस्ते मार्गाने दिल्लीस दाेन वेळा नेल्याची माहिती पाेलिसांनी  न्यायालयात दिली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमृत बिराजदार यांच्या न्यायालयाने आराेपीच्या पाेलीस काेठडीत तीन एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.

तपास अधिकारी पाेलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी आराेपी शाेएब शेख हा हैदर शेख आणि माेहम्मद कुरेशी या आराेपींसाेबतच्या २०१६ मधील एका खुनाच्या गुन्ह्यातील आराेपी असल्याची माहिती न्यायालयात दिली. कारागृहात शिक्षा भाेगून बाहेर आल्यानंतर शाेएब हा हैदरसाेबत अमली पदार्थ तस्करीत काम करू लागला हाेता. वेगवेगळ्या ठिकाणी अमली पदार्थ पुरविण्याचे काम ताे करत हाेता. सरकारी वकील नीलिमा इथापे यादव यांनी आराेपी याच्या जवळील रिक्षातून दहा लाख रुपये किंमतीचे ५१ ग्रॅम मेफेड्राॅन मिळाल्याची माहिती दिली. गुन्हा उघडकीस आल्यावर ताे मागील एक महिना फरार झाला हाेता. पुण्यातील काेंढवा परिसरात राहत्या घरी आल्यावर त्यास पाेलिसांनी सापळा रचून अटक केली.

हेही वाचा – VIDEO : सुनील तटकरेंवर शेकापच्या जयंत पाटीलांची शेलक्या शब्दांत टीका

हेही वाचा – विश्लेषण : देशातील बेरोजगारांमध्ये ८३ टक्के तरुण! ILO च्या अहवालामध्ये आणखी कोणता धक्कादायक तपशील?

हेही वाचा – महायुतीमध्ये आम्ही नाराज, पुढील तीन दिवसांत निर्णय घेऊ, रामदास आठवलेंचा इशारा

बचाव पक्षातर्फे ॲड. वाजेद खान (बीडकर) यांनी युक्तिवाद केला की, आराेपी हा रिक्षाचालक असून ताे वेगवेगळ्या ठिकाणी भाडे घेऊन जात असे. त्याचा गुन्ह्यात प्रत्यक्ष संबंध नसून त्याला न्यायालयीन काेठडी मंजूर करण्यात यावी. मात्र, न्यायालयाने हे प्रकरण गंभीर असून या गुन्ह्याचे जाळे देशभरात पसरले असून ते दुर्लक्षित करता येणार नाही. देशाच्या सीमेबाहेरदेखील त्याची व्याप्ती पसरली आहे. पाेलिसांनी या गुन्ह्याचा तपास सखाेल करणे गरजेचे आहे. त्यामुळे तपास अधिकारी यांना आराेपीची चाैकशी करण्यासाठी आवश्यक वेळ देण्यात येत आहे.