राज्यातील गुणवंत कामगारांचे ‘कोरडे कौतुक’

२०१५, २०१६ च्या पुरस्कारांचे वितरण अन् दोन वर्षांतील मानकऱ्यांची घोषणाही नाही

शिवाजी खांडेकर

मंदीच्या तडाख्यातही कंपन्यांमध्ये इमानेइतबारे उत्कृष्ट काम करुन कंपनीच्या आणि उद्योगजगताच्या प्रगतीमध्ये मोलाची भर करणाऱ्या कामगारांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यास सरकारला मुहूर्त मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सन २०१५ आणि २०१६ या वर्षांचे गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर होऊनही त्यांच्या वितरणासाठी सरकारला गेल्या दोन वर्षांत वेळ मिळालेला नाही.

गुणवंत कामगार पुरस्कार वितरण सोहळा गेली दोन वर्षे रखडला आहे. तर २०१७ आणि २०१८ या दोन वर्षांचे पुरस्कार अद्याप जाहीरच करण्यात आलेले नाहीत.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून दरवर्षी राज्यातील ५० कामगारांना गुणवंत कामगार पुरस्कार आणि एका कामगाराला कामगार भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारासाठी कामगाराची एखाद्या कंपनीमध्ये कमीत कमी पाच वर्ष सेवा झालेली असणे अपेक्षित आहे. तर कामगार भूषण पुरस्कारासाठी गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार मिळाल्यानंतर एखाद्या कंपनीमध्ये दहा वर्ष सेवा झालेली असणे अपेक्षित आहे.  पुरस्कारांसाठी कामगारांकडून दर वर्षी डिसेंबर महिन्यात रीतसर अर्ज मागविण्यात येतात. त्यानंतर कामगारांची मुलाखत घेतली जाते. मुलाखत प्रक्रियेनंतर कामगार कल्याण मंडळाच्या निवड समितीकडून कामगारांची निवड करुन पुरस्कार विजेत्या कामगारांची घोषणा केली जाते.

झाले काय? कामगार कल्याण मंडळाने सन २०१५ आणि २०१६ या वर्षांतील कामगार भूषण आणि गुणवंत कामगार पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली. सन २०१५ सालच्या पुरस्कारार्थीची नावे २०१६ मध्ये, तर २०१६ मधील पुरस्कार्थीची नावे २०१७ मध्ये जाहीर करण्यात आली. मात्र, दोन वर्षे उलटूनही पुरस्कारांचे वितरण अद्याप झालेले नाही. पुरस्कार यादीत नाव असूनही सरकारकडून पुरस्काररुपी कौतुकाची थाप मिळत नसल्याने पुरस्कारार्थी कामगारांकडून खेद व्यक्त केला जात आहे.

* कामगार भूषण पुरस्कारासाठी २५ हजार रुपये रोख, स्मृती चिन्ह आणि प्रशस्तिपत्र देण्यात येते.

* गुणवंत कामगार पुरस्कारासाठी १५ हजार रुपये रोख, स्मृती चिन्ह आणि प्रशस्तिपत्र दिले जाते.

* पुरस्काराचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर कामगारांना कंपनी व्यवस्थापनाकडून पगारवाढ दिली जाते.

* कंपनीकडून कुटुंबासह पुरस्कार विजेत्या कामगारांचा विशेष सन्मान केला जातो.

* पुरस्कारांचे वितरण न झाल्यामुळे पुरस्कारविजेत्या कामगारांना पगारवाढ मिळालेली नाही.

सन २०१५ या वर्षीच्या गुणवंत कामगार पुरस्कारासाठी माझी निवड झाली आहे. तसे पत्र कामगार कल्याण मंडळाकडून मला आले आहे. मात्र, दोन वर्ष उलटूनही पुरस्काराचे वितरण झालेले नाही. त्यामुळे माझा हिरमोड झाला. कंपनीकडून पगारवाढही मिळालेली नाही. कामगार कल्याण आयुक्तांकडे संपर्क केला तर त्यांनी सरकारला पत्र लिहिले आहे, एवढीच माहिती दिली गेली. लवकरात लवकर पुरस्कारांचे वितरण करुन सरकारने कामगारांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी.

– दत्तात्रय येळवंडे, २०१५ मधील गुणवंत कामगार पुरस्कार विजेते

२०१५ आणि २०१६ या वर्षीचे गुणवंत कामगार आणि कामगार भूषण पुरस्कारांसाठीची निवड करण्यात आली आहे. मात्र, त्याचे वितरण अद्याप झालेले नाही हे खरे आहे. तसेच, सन २०१७ आणि २०१८ या वर्षांसाठीच्या पुरस्कारांसाठी कामगारांची निवड झालेली नाही, एवढीच माहिती माझ्याकडे आहे. पुरस्कार वितरण आणि पुरस्कार विजेत्यांची निवड वरिष्ठ कार्यालयाकडून केली जाते.

– समाधान भोसले, प्रभारी आयुक्त, कामगार कल्याण मंडळ, पुणे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dry appreciation of quality workers in the state abn