पुणे : राज्यात सुरू असलेले द्विलक्ष्यी (बायफोकल) अभ्यासक्रम बंद करून राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखड्यानुसार (एनएसक्यूएफ) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून नवीन व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार होते. मात्र, द्विलक्ष्यी व्यवसाय अभ्यासक्रम कृती समितीने केलेल्या विरोधानंतर ‘एनएसक्यूएफ’मध्ये रूपांतरित नवीन व्यवसाय अभ्यासक्रमांच्या स्थगितीला मुदतवाढ देण्यात आली असून, नवीन अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून राबवण्यात येणार आहेत. त्यामुळे द्विलक्ष्यी अभ्यासक्रम कायम राहणार आहेत. परिणामी, अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधील संभ्रमही दूर होण्यास मदत होणार आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. राज्यात तांत्रिक, कृषी, वाणिज्य, मत्स्य या गटांतील १६ द्विलक्ष्यी अभ्यासक्रम राबवण्यात येतात. २० जून २०२३ च्या शासन निर्णयानुसार, १३ व्यवसाय अभ्यासक्रम ‘एनएसक्यूएफ’शी सुसंगत करण्यात आले आहेत, तर मत्स्य गटातील दोन आणि तांत्रिक गटातील एक अभ्यासक्रम बंद करण्यात आला आहे. त्या शासन निर्णयानुसार, ‘एनएसक्यूएफ’ रूपांतरित द्विलक्ष्यी व्यवसाय अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून लागू करण्यास मान्यता देण्यात आली होती. मात्र, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येणार असल्याचे सांगत द्विलक्ष्यी व्यवसाय अभ्यासक्रम कृती समितीने या निर्णयाला विरोध केला होता.

या पार्श्वभूमीवर, एनएसक्यूएफ रूपांतरित नवीन व्यवसाय अभ्यासक्रम राबविण्यास २०२६-२७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ‘सद्य:स्थितीत सुरू असलेले द्विलक्ष्यी व्यवसाय अभ्यासक्रम राबविणाऱ्या संस्था, महाविद्यालयांनी एनएसक्यूएफ रूपांतरित नवीन व्यवसाय अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून सुरू करावेत,’ असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘नवीन तुकडी मान्यता स्वतंत्रपणे’

‘द्विलक्ष्यी व्यवसाय अभ्यासक्रम राबविणाऱ्या ज्या संस्था, महाविद्यालयांनी नवीन किंवा अधिकच्या तुकड्यांना कायमस्वरूपी विनाअनुदानित तत्त्वावर व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज सादर केले आहेत, त्यांना मान्यता देण्याची कार्यवाही स्वतंत्ररीत्या करण्यात येत आहे,’ असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.