पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने शहरातील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष बससेवेचे नियोजन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.या नियोजनानुसार परतीच्या प्रवासासाठी रविवारी (२२ जून) सासवड येथून महिला भाविकांसाठी गर्दीनुसार आणि आवश्यकतेनसार महिला विशेष बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच सासवड येथून ७५ अतिरिक्त गाड्या आणि मार्गावरील नियमित ३४ अशा एकूण १०९ गाड्यांद्वारे सुविधा देण्यात आली आहे.
वडकी नाला येथून हडपसर आणि पुणे शहरात येण्यासाठी २० विशेष बस सुरू ठेवण्यात येणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम सोमवारी (२३ जून) सासवड येथे असल्याने सासवड येथून वीर, जेजुरी, नारायणपूर आणि प्रतिबालाजी येथे विशेष बससेवा उपलब्ध आहे.
मेट्रोसाठीही पीएमपीकडून शुक्रवारी काही ठिकाणी मेट्रो फीडर सेवा देण्यात आली. विश्रांतवाडी, वाकडेवाडी, जुना पुणे-मुंबई रस्ता बंद असल्याने भोसरी-पिंपरी नाशिक फाटा मेट्रो स्थानक, चिंचवडगाव-पिंपरी मेट्रो स्थानक, निगडी-पिंपरी मेट्रो स्थानक, मुकाई चौक-पिंपरी मेट्रो स्थानक परिसरात ही सेवा देण्यात आल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.