पुणे : पुणे विमानतळावर मंगळवारी (२३ सप्टेंबर) रात्री सुरक्षा तपासणीत एका महिलेच्या पिशवीत (हँडबॅग) पिस्तूल आणि दोन काडतुसे सापडल्याने खळबळ उडाली. संबंधित महिला सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी येथील रहिवासी असून, तिच्याकडे शस्त्र परवाना नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विमानतळ पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका ४४ वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विमान कंपनीचे प्रतिनिधी जयेंद्र शिरोडकर यांनी फिर्याद विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला मंगळवारी रात्री पुणे विमानतळावरून दिल्लीला जाणार होती. सुरक्षा यंत्रणेत (सिक्युरिटी लेव्हल-२ ए मशिन) सामानाची तपासणी सुरू असताना तिच्याकडील हँडबॅगेत पिस्तूल आणि मॅगझिनमध्ये दोन काडतुसे आढळली. सुरक्षा तपासणीत पिस्तूल आणि काडतुसे सापडल्याने विमानतळ सुरक्षा यंत्रणेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला. प्राथमिक चौकशीत संबंधित महिलेकडे शस्त्र परवाना नसल्याची माहिती विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गोविंद जाधव यांनी दिली. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वी पुणे विमानतळावर पंढरपूरमधील राष्ट्रवादीच्या एका नेत्याच्या पिशवीत रिव्हॉल्व्हर आणि काडतुसे सापडली होती. संबंधित नेत्याकडे शस्त्र परवाना होता. मात्र, शस्त्र परराज्यात नेण्याचा परवाना नव्हता. ही बाब उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.