पुणे : दिवाळीनिमित्त विमान प्रवासी संख्येत होणारी वाढ लक्षात घेता, ‘चेक-इन’ प्रक्रियेचा वेळ वाचवण्यासाठी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाने ‘डायनॅमिक काउंटर’ प्रणाली लागू केली आहे. तसेच, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) अतिरिक्त कर्मचारी, विमान कंपन्या, पार्किंग व्यवस्थापन यांच्याशी समन्वय वाढवून उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विमान प्रवाशांचा प्रवास सुकर होत आहे.

पुणे विमानतळावरून प्रवास करताना ज्या विमान कंपनीच्या प्रवासाचे आरक्षण केले आहे, त्याच ठिकाणी चेक-इन या सुरक्षा तपासणीला सामोरे जावे लागते. या प्रक्रियेला पाच ते दहा मिनिटांचा कालावधी लागतो. मात्र, दिवाळीनिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता ‘डायनॅमिक काऊंटर’ प्रणाली लागू केली आहे. त्यामुळे कोणत्याही कंपनीच्या प्रवाशाची तपासणी इतर कोणत्याही विमान कंपनीच्या काऊंटरवर सहज करता येत आहे.

प्रत्येक विमान कंपनीने ही प्रणाली वापरण्यास सुुरुवात केल्याने प्रवाशांचा चेक-इन साठी लागणारा वेळ कमी झाला आहे. लांब लागणाऱ्या रांगा, होणारी गर्दी टाळणे शक्य होत आहे, अशी माहिती पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी दिली.

ढोके म्हणाले, ‘सुरक्षा तपासणी आणि चेक-इन प्रक्रियेसाठी सर्व काउंटर आता डायनॅमिक स्वरूपात कार्यरत करण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व विमान कंपन्यांना अतिरिक्त कर्मचारी सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काउंटर रिक्त होताच त्याचा त्वरित वापर करून प्रवाशांची तपासणी -कागदपत्र छाननी प्रक्रिया जलद पूर्ण होत आहे. याशिवाय, मल्टि-लेव्हल कार पार्किंग सुविधेसाठीही वाहतूक व्यवस्थापन आणि गाड्यांची कोंडी टाळण्यासाठी स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.’

प्रवाशांकडूनही या प्रणालीचा पुरेपूर अवलंब करण्यास सुरुवात झाली असून, चेक-इन प्रक्रिया विना अडथळा, रांगेत उभे न राहता होत असल्याने चांगला प्रतिसाद दिला जात आहे. ‘कुटुंबासोबत मी बंगळुरूला जाण्यासाठी विमानतळावर आलो असता, कुटुंबातील सदस्यांनी दुसऱ्या कंपनीच्या काऊंटरवर चेक-इन प्रक्रिया पार पाडली. त्यामुळे वेळ वाचला असून, विमानतळामध्ये सुलभ प्रवेश मिळाला. इतर वेळी ही प्रक्रिया वेळ घेते,’ अशी भावना विमान प्रवासी प्रतिभा अय्यर यांनी व्यक्त केली.

दिवाळीनिमित्त प्रवाशांची गर्दी आणि त्यानुसार सुरक्षितता महत्त्वाची असल्याने विमानतळ प्रशासनाने मनुष्यबळ वाढविले आहे. त्याचबरोबर दिवाळीपर्यंत ‘सीआयएसएफ’कडे अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्याची विनंती केली आहे. तसेच, सर्व विमान कंपन्यांनीही प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्याच्या सूचना केल्या आहेत. – संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ