घरातील ओला कचरा जिरविण्यासाठी पुण्यात गेल्या दशकभरात ‘इफेक्टिव मायक्रोऑरगॅनिझम’ अर्थात इ.एम. सोल्युशन हे तंत्रज्ञान वाढीस लागले आहे. त्याचा उपयोग करून घरातील ओल्या कचऱ्याचे ४५ दिवसांत खत बनतेच; शिवाय हेच द्रावण स्वयंपाकघरातील सिंक, पाईप आतून स्वच्छ करायला, हानिकारक डिर्टजटविना कपडे स्वच्छ करायला आणि फिनेलसारख्या रासायनिक पदार्थाविना फरशी पुसायलाही उपयोगी पडते!
वेगवेगळ्या तीन जीवाणूंचे मिश्रण असलेले हे द्रावण. ते सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी कार्यरत असते आणि प्रकाशाविनासुद्धा. १९८० च्या दशकात जपानमध्ये विकसित केलेले हे मिश्रण गेली दहा-बारा वर्षे पुण्यात वापरले जात आहे. त्याच्यामुळे घरातील, सोसायटय़ांमधील आणि हॉटेल्समधील ओला कचरा व्यवस्थित जिरतो. त्याचे ४५ दिवसांत खत बनते. साठणाऱ्या कचऱ्याची दरुगधी, माशा यांचे प्रमाणही लक्षणीय कमी होते. या द्रावणातील सूक्ष्म जीव गूळ व पाणी टाकून सक्रिय करावे लागतात. पुढे ४५ दिवस ते वापरता येतात.
ओला कचरा कसा जिरवायचा?
– रोजचा कचरा डब्यात किंवा खड्डय़ात साठवला जातो
– त्यावर दररोज सक्रिय केलेले इएम द्रावण फवारले जाते
– आठवडय़ानंतर नवा कचरा दुसऱ्या कंटेनरमध्ये साठवला जातो
– आधीचा कचरा आठवडय़ानंतर खाली-वर केला जातो
– कचरा साठवणे सुरू केल्यानंतर ४५ दिवसांत खत तयार होते
जीवाणू कसे सक्रिय केले जातात?
मूळ इएम द्रावणात विशिष्ट प्रमाणात पाणी व गूळ मिसळून त्यातील जीवाणू सक्रिय केले जातात. हे तयार झालेले द्रावण पुढे दीड महिन्यांपर्यंत वापरता येते.
अर्थकारण :
इएम द्रावणाचा १ लिटरचा खर्च ३४० रुपये, त्यात एक किलो गूळ मिसळावा लागतो. त्याचा खर्च साधारणत: ३०-४० रुपये. अशा प्रकारे एकूणपावणेचारशे रुपयांच्या खर्चामध्ये एका कुटुंबाला पाचशे दिवसांचा ओला कचरा जिरवता येतो. म्हणजे दिवसाला एक रुपयापेक्षाही कमी खर्च.
द्रावणाचे इतर फायदे :
– द्रावणात कपडे किंवा खरकटी भांडी भिजवली तर स्वच्छ निघतात
– स्वयंपाक घरातील सिंक, पाईप आतून साफ करण्यासाठी टाकतात
– फरशी पुसण्यासाठी उपयोग होतो, खत म्हणूनही वापरतात
– पाळीव प्राण्यांना अंघोळ घालण्यासाठी वापरतात
‘‘इएम द्रावणाचा उपयोग केल्यास घरातील ओला कचरा जिरेल. प्रत्येकाने हे केल्यास शहरातील कचऱ्याची निम्मी समस्या कमी होईल. कचऱ्याची वाहतूक, त्यासाठीची यंत्रणा, त्याचा खर्च हे प्रश्नसुद्दा आपोआप सुटतील.’’
– मुकुंद जेरे, भूमी अॅग्रो सव्हिसेस
संपर्कासाठी ईमेल- bhumiagroservices@yahoo.com