पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाआघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचार खर्चामध्ये आढळून आलेली तफावत वाढली आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दोन्ही उमेदवारांना तातडीने खर्चाचे स्पष्टीकरण देण्याबाबत दुसरी नोटीस बजाविली आहे.

शिरूर मतदारसंघातून ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. उमेदवारांच्या दैनंदीन प्रचारखर्चावर निवडणूक खर्च विभागाचे बारीक लक्ष असून दैनंदीन ताळेबंद ठेवला जात आहे. उमेदवारांच्या प्रचार खर्चाची पहिली तपासणी ३ मे रोजी पार पडली. त्यामध्ये आढळराव यांच्या खर्चात २४ लाख २७ हजार ९२१ रुपये, तर कोल्हे यांच्या खर्चात १३ लाख ५४ हजार तीन रुपये इतक्या खर्चाची तफावत आली. उमेदवारांनी सादर केलेला आणि प्रशासनाने नोंदविलेला हिशोब जुळत नसल्याचे समोर आले. त्यानुसार दोन्ही उमेदवारांना ५ मेपर्यंत खर्च सादर करण्याबाबत नोटीस बजाविण्यात आली होती. त्यानंतर ७ मे रोजी दुसऱ्या टप्प्यातील खर्चाची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये आढळराव यांच्या खर्चात ३० लाख ४६ हजार ७८६ रुपये, तर कोल्हे यांच्या खर्चात ११ लाख ७७ हजार ४५८ रुपयांची तफावत येत आहे. त्यामुळे याबाबत खुलासा करावा, अशी दुसरी नोटीस निवडणूक निर्णय अधिकारी मोरे यांनी बजावली आहे.

हेही वाचा >>> अजित पवार म्हणाले, ‘नथुराम गोडसेंची भूमिका करणाऱ्या अमोल कोल्हेंना…’

आढळराव आणि कोल्हे यांच्या ७ मेपर्यंतच्या प्रचार खर्चाचा आढावा

शिवाजी आढळराव पाटील यांनी ७ मेपर्यंत २२ लाख ९१ हजार ५४८ रुपये खर्च केल्याचे सादर केले आहे. मात्र, प्रशासनाने ५३ लाख ३८ हजार ३३४ रुपये खर्च केल्याचे नोंदवहीत नमूद केले आहे. त्यामुळे आढळराव यांच्या प्रचार खर्चात ३० लाख ४६ हजार ७८६ रुपयांची तफावत येत आहे. अमोल कोल्हे यांनी ७ मेपर्यंत ३२ लाख १८ हजार ९६८ रुपये खर्च केल्याचे सादर केले आहे. मात्र, प्रशासनाच्या नोंदवहीत ४३ लाख ९६ हजार ४२६ रुपयांचा खर्च झाल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे कोल्हे यांच्या प्रचार खर्चात ११ लाख ७७ हजार ४५८ रुपयांची तफावत येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सहा अपक्ष उमेदवार अनुपस्थित शिरूरमधून महायुती आणि महाआघाडीच्या उमेदवारांसोबत अपक्ष उमेदवार अमोल पाचुंदकर, चांगदेव गायकवाड, संजय जगदाळे-सोळंके, प्रकाश जमधडे, सलीम सय्यद, स्वप्नील शेलार या सहा उमेदवारांनी हिशोब तपासणीच्या दिवशी अनुपस्थित राहिल्याने त्यांनाही नोटीस बजाविण्यात आली आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी मोरे यांनी सांगितले.