पुणे : अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशांसाठी शिक्षण विभागाने स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून १५ मेपर्यंत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी करण्यात येणार असून, १९ मेपासून विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील अकरावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाकडून अकरावीच्या प्रवेशांसाठी https://mahafyjcadmissions.in हे अधिकृत संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. नवे संकेतस्थळ ९ मेपासून कार्यान्वित करण्यात आले आहे. शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार शाळा, महाविद्यालयांनी १५ मेपर्यंत नोंदणी करून त्याचे प्रमाणीकरण करण्यात येणार आहे.
दहावीचा निकाल १५ मेपूर्वी जाहीर होणे अपेक्षित आहे, तर १९ ते २८ मे या कालावधीत विद्यार्थ्यांनी नोंदणी करणे अपेक्षित असून, प्राधान्यक्रमही नोंदवले जाणार आहेत. गेल्या वर्षीपर्यंत मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती या पाच विभागांतच अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जात होती.
उर्वरित भागांत पारंपरिक पद्धतीने कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्तरावरच प्रवेश देण्यात येत होते. येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात सर्वत्रच अकरावीचे ऑनलाइन पद्धतीने होणार असून, त्यासाठीची कार्यपद्धती, नियमावली शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, ऑफलाइन पद्धतीने करण्यात आलेली कोणतीही प्रवेश प्रक्रिया वैध मानली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.