पुणे : दरवाजा बंद झाल्याने सदनिकेत अडकलेल्या ज्येष्ठ महिलेची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली. सदनिकेत बेशुद्धावस्थेत पडलेल्या ज्येष्ठ महिलेला जवानांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. कोंढवा भागातील लुल्लानगर भागात ही घटना घडली. जवानांच्या तत्परतेमुळे ज्येष्ठ महिलेचे प्राण बचावले. कोंढवा परिसरात लुल्लानगर भागातील एका इमारतीतील सदनिकेत ७१ वर्षीय महिला एकट्या राहायला आहेत. सदनिकेचा दरवाजा अचानक बंद झाल्याने त्या घरात अडकल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला दुपारी पावणेचारच्या सुमारास मिळाली.

हेही वाचा >>> कल्याणीनगर अपघात प्रकरणात शरण आलेल्या आरोपीला पोलीस कोठडी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पहिल्या मजल्यावर असलेल्या सदनिकेत ज्येष्ठ महिला बेशुद्धावस्थेत पडली असून, घराचा दरवाजा बंद झाल्याचे जवानांच्या लक्षात आले. जवानांनी तातडीने उपकरणांचा वापर करुन मुख्य दरवाजा उघडला. ज्येष्ठ महिला शयनगृहात बेशुद्धावस्थेत पडल्या होत्या. जवानांनी डॉक्टरांशी संपर्क साधला. त्यांना त्वरीत रुग्णवाहिकेतून उपचाराकरिता रवाना केले. वैद्यकीय उपचारानंतर ज्येष्ठ महिलेची प्रकृती स्थिर आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी योग्य वेळेत घटनास्थळी येऊन ज्येष्ठ महिलेचा जीव वाचविला, अशी माहिती रहिवाशांनी दिली. कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्रातील वहनचालक सत्यम चौखंडे व तांडेल महादेव मांगडे, जवान निलेश वानखेडे, सागर दळवी, हर्षद येवले, मनोज भारती, हर्ष खाडे यांनी ही कामगिरी केली.