आठवणीतील निवडणूक : कमल ढोले-पाटील

आरक्षणाद्वारे महिलांना राजकारणात संधी देणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दूरदृष्टीपणाच्या धोरणाचा परिपाक म्हणून भवानी विधानसभा मतदारसंघातून माझ्यासारख्या महिलेला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. आमदार म्हणून मी कामही चांगले केले. आणखी एकदा आमदारकीची संधी मिळेल असे वाटले होते, पण नंतर मतदारसंघाच्या फेररचनेमध्ये भवानी मतदारसंघाचा काही भाग कसबा, भवानी आणि कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघांना जोडला गेला, तर पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ राखीव झाला. त्यामुळे माझी आमदारकीची संधी हुकली.

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली त्यावेळी शरद पवार यांनी २००४ मध्ये मला संधी देण्याचे निश्चित केले होते. त्यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये उल्हास ढोले-पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात होते.

मात्र, अगदी थोडक्या मतांनी त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले होते. २००४ मध्ये पवार साहेबांनी ‘उल्हासराव तुम्ही थांबा, यंदा नानी निवडणूक लढतील’, असे सांगितले. त्यामुळे माझी उमेदवारी पक्षाध्यक्षांनीच निश्चित केली होती. सलग दोन वेळा आमदार असलेले शिवसेनेचे दीपक पायगुडे आणि काँग्रेसचे हाजी नदाफ अशा तिरंगी लढतीमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिला मतदारांनी केलेल्या मतदानामुळे विजयाची माळ माझ्या गळ्यात पडली. त्यापूर्वी उल्हासराव आणि मी अशा आम्ही दोघांनी नगरसेवक म्हणून केलेल्या कामाची पुण्याई मला मतदानाच्या स्वरूपात मिळाली. कार्यकर्त्यांनी माझ्या विजयासाठी अपार कष्ट केले.

मतमोजणी झाल्यानंतर माझ्या विजयाची घोषणा तेवढी बाकी होती. मात्र, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दोनदा फेरमतमोजणीची मागणी केली. त्यानंतरही निकालामध्ये बदल घडला नाही. तिसऱ्यांदा मतमोजणीची मागणी केली गेली त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या वर्षां उंटवाल यांनी ती फेटाळून लावली आणि माझ्या विजयाची घोषणा केली. महिला अधिकाऱ्याच्या हातून मला विजयी झाल्याचे प्रमाणपत्र मिळाले हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण होता. आमदार म्हणून विजयी झाल्यानंतर उल्हासराव ढोले-पाटील यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले. ‘मी आमदार व्हावे ही पवार साहेबांची इच्छा होती, ते शक्य होऊ शकले नाही. मात्र, माझे राहिलेले स्वप्न तू पूर्ण केले’, असे म्हणत उल्हासराव यांनी माझ्या हातामध्ये आपला हात मिळवून माझे अभीष्टचिंतन केले. माझ्या आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण मी कधीच विसरू शकणार नाही.

आमदार म्हणून मी पाच वर्षे प्रामाणिकपणे काम करून मतदारांच्या कसोटीला उतरले. स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने ससून रुग्णालयाचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी मला मिळाली. त्यावेळी आमदार निधीतून मी केलेल्या तरतुदीतून ससून रुग्णालयाची अकरा मजली इमारत उभी राहिली आहे. आता राजकीय पद नसले तरी अजूनही राजकीय आणि सामाजिक कामांमध्ये मी आपल्या परीने योगदान देत असते.

शब्दांकन : विद्याधर कुलकर्णी