पुणे: पुणे ते दौंड दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. या मार्गावरील रेल्वे सेवा उपनगरी करण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या मुख्यालयाने रेल्वे मंडळाकडे पाठविला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास या मार्गावर डिझेल मल्टिपल युनिटऐवजी (डेमू) इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (एमू) गाड्या धावणार असून, तिकिटांचे दरही कमी होणार आहेत.

पुणे ते दौंड दरम्यानची रेल्वे सेवा लोकल म्हणजेच उपनगरी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्यालयाने याबाबतचा प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे पाठविला आहे. या प्रस्तावावर रेल्वे मंडळाकडून विचार सुरू आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास पुणे-दौंड मार्गावर डेमूऐवजी एमू गाड्या धावणार आहेत. डेमू गाड्या या दहा डब्यांच्या असतात. त्याच वेळी एमू गाड्यांना प्रत्येकी चार डब्यांचे किमान तीन युनिट असतात. त्यामुळे या मार्गावर किमान १२ डब्यांच्या गाड्या धावू शकतील, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली.

हेही वाचा… आरटीओच्या सेवा आता विनाविलंब! अर्ज करा अन् सात दिवसांत घरपोच लायसन्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे-दौंड मार्गावरील गाड्या सध्या एक्स्प्रेस अथवा पॅसेंजर म्हणून धावतात. त्यांचा किमान तिकीट दर ३० रुपये आहे. कोविड काळापासून हा नियम लागू झाला आहे. त्याआधी या मार्गावर धावणाऱ्या केवळ एका गाडीलाच किमान १० रुपये तिकीट दर आहे. या मार्गावर लोकल सेवा सुरू झाल्यास किमान तिकीट दर ५ रुपये होईल. त्यामुळे प्रवाशांना फायदा होणार आहे, असे रेल्वेतील सूत्रांनी स्पष्ट केले.