पुणे : कर्वेनगर भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील अतिक्रमणांवर महापालिका प्रशासनाने कारवाई करून हा चौक मोकळा केला. पोलीस बंदोबस्तात महापालिकेच्या पथ, बांधकाम तसेच अतिक्रमण विभागाने संयुक्तपणे ही कारवाई केली. या कारवाईमध्ये बेकायदा टपऱ्या, कमानी, तसेच बेकायदा बांधकामांवर कारवाई करून मोठ्या प्रमाणात राडारोडा काढून टाकण्यात आला.

बेकायदा पार्किंग, चौकांमध्ये अनधिकृत दुकाने यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याचे समोर आले होते. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पावले उचलली आहेत. गेल्या तीन दिवसांपासून बेकायदा जाहिरात फलकांवर कारवाई करून चौक रिकामे करण्यात येत आहेत.

महापालिकेचा पथ, बांधकाम आणि अतिक्रमण विभागाने शुक्रवारी सकाळी पोलिसांच्या मदतीने कर्वेनगर परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील अतिक्रमणांवर कारवाई केली. या कारवाईत खाद्यपदार्थांचे स्टॉल, टपऱ्या, यांसह राजकीय मंडळींनी तात्पुरत्या स्वरूपात उभारलेली बेकायदा कार्यालये, कमानी, काढून टाकण्यात आल्या.

या कारवाईमुळे येथे मोठ्या प्रमाणात राडारोडा जमा झाला होता. हा राडारोडादेखील महापालिकेने काढून टाकला. या कारवाईनंतर पुन्हा या चौकात अतिक्रमणे होणार नाहीत, यासाठी आवश्यक ती काळजी महापालिकेच्या वतीने घेतली जाणार आहे. तसेच, या भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अडथळा ठरत असलेली भिंत काढली जाणार असल्याचे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात आयुक्त राम यांनी महापालिकेच्या विविध विभागांच्या प्रमुखांची बैठक घेतली होती. या बैठकीत वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने शहरातील प्रमुख ३२ रस्ते आणि वाहतूक कोंडी होणाऱ्या २२ ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या पथ विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून कोंडीची कारणे काय आहेत, याचा अहवाल सादर केला. त्यानंतर महापालिकेने वाहतूक कोंडीला जबाबदार असलेल्या घटकांचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना सुरू केली.

पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिलेल्या आदेशानंतर महापालिकेच्या अभियंत्यांनी या परिसराची पाहणी केली होती. त्यानंतर अतिक्रमणे काढून घेण्यासाठी सर्वांना नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या. त्यानंतरही अतिक्रमणे काढून न घेतल्याने ही कारवाई करण्यात आली. कारवाईमध्ये अतिक्रमणे, राडारोडा हटवून १० हजार चौरसमीटर जागा मोकळी करण्यात आली आहे. – अनिरुद्ध पावसकर मुख्य अभियंता, पथ विभाग, पुणे महापालिका