पुणे : राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) येत्या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेसाठी व्यवस्थापनशास्त्र पदवी (बीबीए, बीएमएस), संगणक उपयोजन ( बीसीए) या पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्यात येणार आहे. या परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.

 व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर पदवी (एमबीए), संगणक उपयोजन पदव्युत्तर पदवी (एमसीए) या व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या धर्तीवर बीसीए, बीबीए, बीएमएस हे पदवी अभ्यासक्रम आपल्या अखत्यारित घेण्याचा निर्णय अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) घेतला. सीईटी सेलकडून अभियांत्रिकी, व्यवस्थापनशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र अशा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येते. या पार्श्वभूमीवर आता बीसीए, बीबीए, बीएमएस या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीही प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेतील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया होणार आहे. सीईटी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सीईटी सेलकडून लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या परीक्षेचे वेळापत्रक आणि माहिती सीईटी सेलच्या वेबसाइटवर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती सीईटी सेलने दिली.

हेही वाचा >>>घाटावरील वाढता विरोध खासदार बारणेंची डोकेदुखी

 आतापर्यंत बीसीए, बीबीए, बीएमएस अभ्यासक्रमांचे प्रवेश महाविद्यालय स्तरावर होत होते. मात्र, आता अभ्यासक्रमांना एआयसीटीईची संलग्नता आवश्यकता बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच एआयसीटीईच्या निकषांनुसार पायाभूत सुविधा, शैक्षणिक व्यवस्था कराव्या लागणार आहेत. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाचा दर्जा मिळाल्याने  या अभ्यासक्रमांचे शुल्कही वाढण्याची चिन्हे आहेत.