पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान तर्फे न-हे – आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाअंतर्गत साकारण्यात आलेल्या सरकारवाड्याची पाहणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. ‘शिवसृष्टी’ हा आशियातील सर्वात भव्य ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्प असून त्याचा पहिला टप्प्या असलेल्या सरकारवाडा या ठिकाणी कामकाजाचे ठिकाण, भव्य संशोधन ग्रंथालय, प्रदर्शनी दालन आणि बहुउद्देशीय सभागृह उभारण्यात आले आहे. या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण अमित शाह यांच्या उपस्थित झाले. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री चंद्रकांत पाटील आदींची उपस्थिती होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज शिवजंयती आहे आणि हाही योगायोग आहे की काल शिवरात्र होती. जे शिवतत्व खऱ्या अर्थाने तुम्हाला आम्हाला तेज देतं. त्या तेजाचं प्रतिक असलेले, छत्रपती शिवराय यांच्या जयंतीच्या निमित्त आपण सर्व लोक त्यांना नमन करूया. आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे, की या पवित्र दिवशी शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण होत आहे आणि ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हातून होत आहे, हेदेखील अत्यंत महत्त्वाचं आहे. याच कारण असं आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे केवळ छत्रपतींना आदर्शच मानतात असं नाही, तर छत्रपतींच्या जीवनावर सातत्याने त्यांनी संशोधन केलं आहे आणि मराठा साम्राजाच्या संदर्भात वेगवेगळे दस्ताऐवज प्राप्त करून, महाराजांपासून ते वसईच्या संधी पर्यंत ज्या काही घटना आहेत, त्या घटना लेखणीबद्ध करून ते स्वत: यावर एक पुस्तक लिहित आहेत. त्यामुळे खरे शिवप्रेमी असलेले अमित शाह ज्यांनी महाराजांची जी संकल्पना आहे स्वधर्म, स्वभाषा आपल्या संस्कृतीचा या ठिकाणी पुरस्कार करणं, हे खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात साकारलेलं आहे. आज गृहमंत्री म्हणूनदेखील पुन्हा एकदा काश्मीरपासून ते पूर्वोत्तर पर्यंत सगळीकडे महाराजांचाच आशीर्वाद घेऊन, त्यांचच तेज घेऊन या ठिकाणी काम करत आहेत. म्हणून मला असं वाटतं की अतिशय योग्य व्यक्तीच्या हातून आज आपण, या शिवसृष्टीचं उद्घाटन करतो आहोत.”

पंतप्रधान मोदींनी शिवरायांकडून उर्जा घेतली –

याचबरोबर “खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील शिवभक्त आहेत. मला आजही आठवतं २०१४ मध्ये ज्यावेळी त्यांची घोषणा ही भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून झाली, त्यावेळी घोषणा झाल्यानंतर सर्वप्रथम ते महाराष्ट्रात आले ते रायगडावर गेले, त्या ठिकाणी महाराजांसमोर नतमस्तक होऊन, ध्यान केलं, महाराजांकडून उर्जा घेतली. त्यानंतर संपूर्ण भारताचा प्रवास करत, संपूर्ण भारतावर व भारतीयांच्या मनावर एक अधीराज्य स्थापन करण्याचं काम हे खऱ्या अर्थाने मोदींनी केलं.” असंही फडणवीसांनी सांगितलं.

…म्हणून मला असं वाटतं की हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे –

याशिवाय, “शिवसृष्टी हा असा प्रकल्प आहे, की जो महाराजांचा इतिहास, महाराजाचं तेज हे आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहचावं आणि आपला स्वाभिमान हा असाच तेवत रहावा. आपल्याला हे समजावं की पारतंत्र्यात खितपत पडलेले असताना, सगळीकडे अंधकार असताना, त्या अंधकारातून प्रकाशाकाडे कोणी नेलं? आज आपण जे आहोत ते कोणामुळे आहोत? हे आपल्याला समजलं पाहिजे यासाठी खऱ्या अर्थाने बाबासाहेब पुरंदरे यांनी या शिवसृष्टीची निर्मिती केली. आज त्याचा पहिला टप्पा पाहिल्यानंतर मी विश्वासाने हे सांगू शकतो, की इथे येणारा प्रत्येक व्यक्ती आणि विशेष करून जी तरुणाई इथे येईल, ते पुन्हा एकदा या ठिकाणाहून राष्ट्रप्रेमाचं शिवतेज घेऊन जातील. आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची एक उर्मी त्यांच्या मनात तयार होईल, आपल्या संस्कृतीबद्दलचा एक अभिमान त्यांच्यामध्ये तयार होईल. म्हणून मला असं वाटतं की हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे.” असंही उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

बाबासाहेब पुरंदरेंनी जो विचार आपल्यापर्यंत पोहचवला आहे तो अजरामर –

“बाबासाहेब पुरंदरे यांनी किती मेहनतीने हे सगळं उभं केलं, जवळपास ५० वर्षे हे स्वप्न त्यांनी आपल्या उराशी बाळगलं, आज त्याच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण होत असताना ते आपल्यामध्ये नसले, तरीदेखील त्यांनी जो विचार आपल्यापर्यंत पोहचवला आहे तो अजरामर आहे आणि आता ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की संपूर्ण शिवसृष्टी या ठिकाणी अस्तित्वात आली पाहिजे. मी आपल्याला निश्चितपणे आश्वास्थ करू इच्छितो आमचे मुख्यमंत्री, मी, चंद्रकांत पाटील, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा आम्ही सगळे आपल्यापरीने हे काम पूर्ण करण्यासाठी जी मदत करता येईल, ती निश्चतपणे करू आणि महाराजांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहचवू. महाराजांचं केवळ क्षात्रतेजच नाही तर व्यवस्थापन शास्त्र, पर्यावरणाबद्दलची दृष्टी, जलनियोजन हे लोकांपर्यंत पोहचलं पाहिजे. सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम आपण निश्चितपणे करू.” असं शेवटी फडणवीस यांनी आश्वासन दिलं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Everyone who sees the shivsrusti will take away the love of the nation from here devendra fadnavis msr
First published on: 19-02-2023 at 13:03 IST