श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला जातो. त्यानुसार, यंदाचा संस्कृत दिवस शनिवारी (९ ऑगस्ट) साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त एका संस्कृत पुस्तक मालिकेची संकल्पना विकसित करणाऱ्या आणि या मालिकेच्या प्रमुख मार्गदर्शक निवृत्त सनदी आधिकारी लीना मेहेंदळे यांच्याशी श्रीराम ओक यांनी साधलेला संवाद.

पहिलीपासून संस्कृत शिकता यावे यासाठी जो उपक्रम राबवत आहात, तो काय आहे?

  • भारतीय विद्या भवन, पुणे या संस्थेच्या दोन्ही शाळांमध्ये चार वर्षांपूर्वी आम्ही एक प्रयोग केला. पालकांच्या संमतीने पहिलीच्या वर्गाला एक अवांतर विषय म्हणून थोड्या प्रमाणात संस्कृत शिकवले. पुढे ही मुले जसजशी वरच्या वर्गात जाऊ लागली तसतसे त्यांच्या पालकांनी इच्छा व्यक्त केली, की यांचा संस्कृतचा अभ्यास कायम ठेवला जावा. त्यामुळे आता चौथीत असलेल्या पहिल्या तुकडीलाही संस्कृत शिकवले जाते. पहिली, दुसरी व तिसरीलादेखील संस्कृत शिकवणे सुरू आहे. या प्रकारे सातवीपर्यंत त्या मुलांचा प्रवास झाल्यानंतर आठवी ते दहावीसाठी शाळेमध्ये संस्कृत विषय निवडीची संधी आहेच. यामुळे आता शिकलेल्या संस्कृतचा पूर्ण फायदा त्या मुलांना या वरच्या तीन वर्गांत निश्चितच होणार आहे.

विद्यार्थ्यांना त्यांच्या वयानुसार संस्कृत शिक्षणासाठी काय सुविधा उपलब्ध केलीत ?

  • पहिली दोन ते अडीच वर्षे थोडे अनौपचारिक पातळीवर संस्कृत शिकवून झाल्यानंतर असा विचार आला, की संस्कृत शिकविण्यासाठी एखादे पुस्तक तयार करावे. या संदर्भात आम्ही कित्येक पुस्तके बघितली, जी वेगवेगळ्या वयोगटासाठी, परंतु पहिल्यांदाच संस्कृत शिकणाऱ्यांसाठी तयार केलेली होती. त्यावरून असे लक्षात आले, की आठवीच्या मुलांना प्रथम संस्कृत शिकवताना त्यांच्यासाठी तयार केले जाणारे धडे आणि पहिलीच्या विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवण्यासाठी तयार केलेले धडे यामध्ये पुष्कळ फरक असायला हवा. पहिलीच्या विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती तीव्र असते, परंतु आकलनशक्ती त्या मानाने प्रगत झालेली नसते. आठवीपर्यंत हे स्मरणशक्ती आणि आकलनशक्तीचे प्रमाण व्यस्त झालेले असते. त्यामुळे जरी कित्येक संदर्भांची पुस्तके पाहिली व त्यातील काही धडे पहिली किंवा दुसरी, तिसरी इत्यादीसाठी योग्य वाटले, तरीसुद्धा एक नवीन पुस्तक तयार करण्याची गरज आहे, हा विचार कायम राहिला. या पुस्तकात रंगीत चित्रांबरोबर श्रवणाची सोय करण्यात आलेली असून, पहिलीच्या पुस्तकात व्याकरण, कृषी, संगणक ओळख, गणित, भूगोल, भारतीय संस्कृती आणि मूल्य शिक्षणाचेही धडे आहेत. हे सगळे ‘संस्कृत ऐका, संस्कृत बोला, संस्कृत वाचा’ या पद्धतीनेच शिकवले जातात.

संस्कृत शिकविण्याचा उद्देश काय आहे?

  • संस्कृतमध्ये शब्दरचनेचे व व्युत्पत्तीशास्त्राचे अत्यंत वैज्ञानिक व तर्कशुद्ध नियम आहेत. आधुनिक वैज्ञानिक विषयांना संस्कृत भाषेत उतरविण्यासाठी लागणारी शब्दावली आपल्याला सहज मिळते किंवा तयार करता येते. याचे उदाहरण द्यायचे, तर आपण भौतिकशास्त्रातील गतीच्या नियमांशी जोडलेले वेग, प्रवेग, संवेग, आवेग असे चार शब्द विचारात घेऊ या. हे सर्व शब्द काही ना काही संबंधांचे आहेत, हे आपल्याला त्या शब्दांच्या ध्वनीवरूनच लक्षात येते. परंतु, या ऐवजी यांचे इंग्लिश शब्द व्हेलॉसिटी, ॲक्सिलरेशन, मोमेंटम आणि इम्पल्स हे ऐकत असताना त्या शब्दांच्या फोनेटिक उच्चारांवरून ते शब्द एकमेकांशी संबंधित असतील, हे लक्षात येऊ शकत नाही. तसेच, संस्कृतमध्ये एकसारख्या भावना व्यक्त करणारी, परंतु त्यातील सूक्ष्म छटांचे वेगळेपण दाखवू शकणारी शब्दावली मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. थोडक्यात, आपल्या सध्याच्या शिक्षण पद्धतीत आपण जे आधुनिक विषय शिकतो त्यांची पूर्वतयारी किंवा त्यांचे बीजारोपण संस्कृत भाषेतून पहिलीच्या वर्गापासून केले जावे व पुढील वर्गांमध्येदेखील या विषयांची वाढती ओळख मुलांना करून दिली जावी, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून हे कार्य आम्ही करत आहोत.ञ
    shriram.oak@expressindia.com