लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील चार मार्गांचा विस्तार पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आला आहे. तसेच दोन मार्गांवर विनावाहक विना थांबा जलद सेवा देण्यात येणार असून तीन मार्ग नव्याने सुरू करण्यात आले आहेत. तसेच एक मार्ग पूर्ववत करण्यात आला आहे. या सर्व सेवांना शुक्रवारपासून (१ सप्टेंबर) प्रारंभ होणार आहे.
आणखी वाचा-पुण्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या १९ बांगलादेशी नागरिकांना पकडले
दांगट इस्टेट ते गालिंद पथ मार्गाचा विस्तार डेक्कन जिमखान्यापर्यंत करण्यात आला आहे. तसेच सिमला ऑफिस ते इंदिरा कॉलेज (ताथवडे) मार्गाचा विस्तार महापालिका भवनापर्यंत, भारती विद्यापीठ ते शनिवारवाडा या मार्गाचा विस्तार शिवाजीनगरपर्यंत तर देहूगाव ते मोशी मार्गाचा विस्तार भोसरीपर्यंत करण्यात आला आहे. सुतारदरा ते पुणे रेल्वे स्थानक हा मार्ग पूर्ववत करण्यात आला असून भोसरी ते महापालिका भवन आणि स्वारगेट ते हडपसर या दोन मार्गांवर विनावाहक विनाथांबा सेवा दिली जाणार आहे. याशिवाय स्वारगेट ते जगदंबा भवन, पिसोळी, निगडी ते जांबे आणि पिंपरी मेट्रो स्थानक ते किवळेगाव हे तीन नवे मार्ग सुरू करण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पीएमपीच्या वाहतूक व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.