पुणे : अभिजात संगीताच्या श्रवणाने दीपावलीचा आनंद द्विगुणित करण्याची सुवर्णसंधी ‘लोकसत्ता दीपस्वर’ मैफलीने पुणेकरांना गुरुवारी (१६ ऑक्टोबर) अनुभवता येणार आहे. किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक पं. जयतीर्थ मेवुंडी आणि लोकप्रिय गायिका सावनी शेंडे हे कलाकार आपल्या स्वराविष्काराने या मैफलीत रंग भरणार आहेत.
सुस्नात झालेली धरणी आणि चराचरात भरून राहिलेला आनंद अशा मनात फुलत जाणाऱ्या दिवाळीला अभिजात स्वरांची जोड हवी. ही दिवाळी आनंददायी आणि सूरमयी व्हावी या उद्देशातून ‘लोकसत्ता’च्या वतीने गुरुवारी (१६ ऑक्टोबर) ‘दीपस्वर’ या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सायंकाळी सव्वासहा वाजता होणारा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य खुला असेल.
रमा एकादशी आणि गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारस या सणांनी शुक्रवारपासून (१७ ऑक्टोबर) दिवाळीची सुरुवात होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच गुरुवारी स्वरांच्या श्रवणाने दीपोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्याच्या उद्देशातून ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित ‘दीपस्वर’ या विशेष कार्यक्रमात पं. जयतीर्थ मेवुंडी आणि सावनी शेंडे यांचा स्वराविष्कार अनुभवण्याची संधी रसिकांना लाभणार आहे. पीएनजी ज्वेलर्स प्रस्तुत ‘लोकसत्ता दीपस्वर’ कार्यक्रमाची सहप्रस्तुती पुनीत बालन ग्रुपची आहे. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड आणि श्री सरस्वती कराड हॉस्पिटल हे कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत.
- मुख्य प्रायोजक : पी एन जी ज्वेलर्स
- सहप्रस्तुती : पुनीत बालन ग्रुप
- सहप्रायोजक : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड, श्री सरस्वती कराड हॉस्पिटल
- कधी : गुरुवार, १६ ऑक्टोबर २०२५
- कुठे : यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड
- केव्हा : सायंकाळी ६.१५ वाजता
विनामूल्य प्रवेशिका आजपासून
‘लोकसत्ता दीपस्वर’ कार्यक्रम विनामूल्य खुला असून, त्याच्या प्रवेशिका आजपासून (रविवार, १२ ऑक्टोबर) सकाळी ९ ते ११.३० आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहावर उपलब्ध असतील. काही जागा राखीव असून, एका व्यक्तीस केवळ एक प्रवेशिका मिळणार आहे.