पुणे : विवाहाच्या आमिषाने चोरट्याने एका महिलेची तीन लाख २३ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी बाणेर पोलिसांकडून माहिती-तंत्रज्ञान कायदा आणि फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला बाणेर भागात राहायला आहेत. चोरट्याने महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. पुतण्याचा विवाह करायचा आहे, असे चोरट्याने महिलेला सांगितले होते. आरोपीने एका नामवंत इलेक्ट्राॅनिक कंपनीत कामाला असल्याची बतावणी केली होती. त्यानंतर महिलेला जाळ्यात ओढून विवाहसाठी काही इलेक्ट्राॅनिक वस्तू खरेदी करायच्या आहेत, असे सांगून महिलेकडून वेळोवेळी तीन लाख २३ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने घेतले.
महिलेने पैसे जमा केल्यानंतर तिला इलेक्ट्राॅनिक वस्तू देण्यात आल्या नाहीत. महिलेने मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. महिलेने नुकतीच बाणेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.
ज्येष्ठ महिलेची ४६ लाखांची फसवणूक
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची ४६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला कर्वेनगर भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर १७ जून रोजी संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले होते. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला ऑनलाइन पद्धतीने बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले.
सुरुवातीला महिलेला परताव्यापोटी रक्कम मिळाल्याचे आरोपींनी भासविले. प्रत्यक्षात महिलेला परतावा दिला नाही. महिलेने महिनाभरात ४६ लाख रुपये चोरट्यांच्या खात्यात जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे तपास करत आहेत. शेअरबाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच घडली.