पुणे: प्रशांत महासागरात सक्रिय असलेल्या एल निनोचा परिणाम म्हणून जागतिक साखर उत्पादनात सुमारे ३५ लाख टन घट येण्याचा अंदाज संयुक्त राष्ट्राच्या जागतिक अन्न संघटनेकडून (एफएओ) व्यक्त करण्यात आला आहे. जगात दरवर्षी सरासरी १७०८.६२ लाख टन साखर उत्पादन होते. जागतिक अन्न संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत महासागरात सक्रिय असलेल्या एल निनोमुळे आशियायी देशांत पर्जन्यवृष्टीत तूट निर्माण झाली आहे.

जगभरात सरासरी तापमानात वाढ झाली आहे. अपुरा पाऊस आणि उष्णतेमुळे उसाच्या वाढीवर परिणाम झाला आहे. साखर उत्पादक चीन, थायलंड, भारत, पाकिस्तान या आशियायी देशांच्या साखर उत्पादनात तूट येण्याचा अंदाज आहे. थायलंडमध्ये सरासरी १०० लाख टनांवरून ८० लाख टनांवर तर भारतात साखर उत्पादन ३३७ लाख टनांपर्यंत खाली येण्याचा अंदाज आहे. २०२१-२२ मध्ये देशात ३५८ लाख टन साखर उत्पादन झाले होते.

हेही वाचा… कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात उद्या पाऊस?

एफएओच्या माहितीनुसार, जागतिक साखर बाजारात २००९ नंतर साखरेचा साठ्यात यंदा मोठी घट होणार आहे. जागतिक साखर बाजारात दोन महिन्यांत साखरेच्या दरात ५५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतीय साखर कारखाना संघाने (इस्मा) भारताच्या साखर उत्पादनात आठ टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. थायलंडच्या साखर कारखाना संघटनेने १५ टक्क्यांची घट होण्यासह उसाच्या उत्पादनावर आणि दर्जावरही परिणाम झाल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या कृषी विभागानेही थायलंडमधील साखर उत्पादनात १५ टक्क्यांनी घट होण्याच्या अंदाजाला दुजोरा दिला आहे.

ब्राझीलची साखर दिलासा देणार

जागतिक साखर संघटना आणि ग्रो इंटेलिजेन्स, या कृषी क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या खासगी फर्मने ब्राझीलमधील साखर उत्पादनात २० टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ब्राझीलमध्ये उसाची उपलब्धता चांगली असल्यामुळे यंदा साखर उत्पादन ४२१ लाख टनांवर जाण्याचा अंदाज आहे. एल-निनोमुळे जगभरातील अन्य देशांत साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर जागतिक साखर बाजाराला ब्राझीलमधील उत्पादनामुळे दिलासा मिळणार आहे. मागील वर्षी ब्राझीलचे साखर उत्पादन ३८० लाख टनांवर थांबले होते. यंदा ४२१ लाख टनांहून जास्त उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

जागतिक साखर बाजार

जागतिक साखर उत्पादन – सरासरी १७०८.६२ लाख टन

जगाला दरवर्षी लागणारी साखर – सरासरी १६८४.७९० लाख टन

एफएओचा अंदाज – जागतिक उत्पादनात ३५ लाख टन घट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताचे यंदाचे साखर उत्पादन- ३३७ लाख टन (अंदाज)