पुणे : जुन्या कांद्याचा मुबलक साठा उपलब्ध असताना बाजारात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीस पाठविला आहे. त्यामुळे कांद्याला मागणी कमी झाली आहे. घाऊक बाजारात एक किलो कांद्याला दहा ते पंधरा रुपये असा भाव मिळत असून, २०१७ नंतर पहिल्यांदाच कांद्याचा भाव उतरल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे.

‘शेतकऱ्यांनी पुणे, मुंबईसह राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीस पाठविला आहे. अहिल्यानगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड करतात. कांद्याची आवक वाढली असताना घाऊक बाजारात एक किलो कांद्याला दहा ते पंधरा रुपये असा भाव मिळाला आहे. सन २०१७ नंतर कांद्याला पहिल्यांदाच कमी भाव मिळत आहे,’ अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी दिली.

‘एप्रिलमध्ये उन्हाळी कांद्याचा हंगाम सुरू झाला. त्या वेळी घाऊक बाजारात कांद्याला २० रुपये भाव मिळाला होता. भाव वाढण्याच्या आशेपोटी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उन्हाळी कांद्याची साठवणूक केली. सध्या शेतकऱ्यांकडे जुना कांदा मुबलक उपलब्ध आहे. श्रीलंका, बांगलादेशात कांद्याची निर्यात होत असे. श्रीलंकेने आयात शुल्कात वाढ केली असून, बांगलादेशातून कांदा खरेदी होत नाही. त्यामुळे कांद्याची निर्यातही थांबली आहे,’ असे कांदा व्यापारी राम नरवळे यांनी सांगितले.

परराज्यांतून मागणी कमी

‘कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश या राज्यांतून महाराष्ट्रातील कांद्याला मागणी होती. मात्र, दक्षिणेकडील राज्यांत कांद्याचा हंगाम सुरू झाला असल्याने या राज्यांतून कांद्याची मागणी कमी झाली. मध्य प्रदेशात कांद्याची लागवड वाढली आहे. गेली दोन वर्षे मध्य प्रदेशात मुबलक कांदा झाला आहे. उत्तरेकडील राज्यांत मध्य प्रदेशातील कांदा विक्रीस पाठविला जात आहे,’ अशी माहिती कांदा व्यापारी रितेश पोमण यांनी दिली.

कांद्याला अपेक्षित दर मिळत नाही. बाजारात जुना कांदा मुबलक आहे. नवीन कांद्याचा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. परदेशात कांद्याची निर्यात होण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक ती पावले उचलली पाहिजेत. कांद्याला स्थानिक बाजारात भाव मिळत नाही. लागवड, वाहतूक खर्च मिळत नसल्याने कांदाउत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कांद्याला पाच रुपये किलो अनुदान दिल्यास काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.आनंदा लक्ष्मण औटी कांदा उत्पादक शेतकरी, पारनेर, अहिल्यानगर