पुणेः स्वतंत्र भारत पार्टीने जाहीर केलेल्या सेबीच्या कार्यालयासमोरील धरणे आंदोलनाला अनेक संघटनांनी पाठिंबा देऊन आंदोलनात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. शेतीमालावर घातलेल्या वायदेबंदीला विरोध करण्यासाठी हजारो शेतकरी २३ जानेवारी रोजी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील सेबीच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, अनिल घनवट यांनी दिली आहे.

अनेक शेतीमालाच्या वायदे बाजारातील व्यापारावर २०२२ मध्ये सेबीने बंदी घातली होती. डिसेंबर २०२२मध्ये ही मुदत संपणार होती. नवीन वर्षात शेतीमालाचे वायदे सुरू होतील, अशी अपेक्षा होती. मात्र सेबीने गहू, तांदूळ, हरभरा, मूग, सोयाबीन व त्याचे उपपदार्थ, मोहरी व त्याचे उपपदार्थ आणि पामतेल आदी शेतीमलांवरील वायदेबंदीस डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे शेतीमालाचे भाव पडले आहेत, त्याचा थेट आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो आहे.

हेही वाचा – ‘व्हिडीओ लाईक कर पैसे मिळतील’, ईझी मनी कमवायला गेला अन् १२ लाख गमावून बसला

या कारवाईचा निषेध करत स्वतंत्र भारत पार्टीने वायदेबंदी मागे घेण्याची सेबीला विनंती केली होती. मात्र, एक महिना होऊनही सेबीने काहीच प्रतिसाद न दिल्यामुळे आंदोलन करण्याची वेळ आली आहे. आंदोलनातील सर्व मागण्या शेतकरी हिताच्या आहेत व त्या मान्य असल्यामुळे शेतकरी संघटना (शरद जोशी), शेतकरी संघटना (रघुनाथ दादा पाटील), किसानपुत्र आंदोलन आदी संघटना आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या आंदोलनाला पाठिंबा देऊन सक्रिय सहभाग घेण्याचे जाहीर केले आहे.

हेही वाचा – राष्ट्रवादीचे बहुमत तरीही अडचणीतील ‘महानंद’ची सूत्रे विखेंच्या हाती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे, माजी आमदार वामनराव चटप, स्वतंत्र भारत पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हरणे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा सीमा नरोडे, पुणे शहर अध्यक्ष महेश गजेंद्रगडकर, तसेच अमित सिंग आदी नेते आंदोलनाचे नेतृत्व करतील. महाराष्ट्रभरातून हजारो शेतकरी २३ जानेवारी रोजी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील सेबी कार्यालयासमोर होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली.