पुणे : बायपोलर मूड डिसऑर्डर या मानसिक आजारामध्ये रुग्णांना भावनिक आंदोलनातून जावे लागते. कधी अतिउत्साह, तर कधी नैराश्याचा सामना करावा लागतो. त्याचा परिणाम रुग्णांसह कुटुंबीयांवर होतो. अनेक वेळा या आजाराची माहितीच त्या व्यक्तीला नसते. त्यामुळे या आजाराबाबत जनजागृती करण्यासह रुग्णांना मार्गदर्शन करण्यासाठी पुण्यात समतोल बायपोलर मूड डिसऑर्डर आधार गट सुरू झाला आहे.

वीरेन राजपूत यांनी समतोलची सुरुवात केली आहे. याबाबत ते म्हणाले, की स्वभावात होणारे मोठे बदल रुग्णासह त्याच्या कुटुंबीयांना त्रासदायक ठरतात. त्यांच्या जीवनात अस्थिरता निर्माण होते. रुग्ण आणि त्याच्या कुटुंबीयांना या मानसिक आजाराबद्दल सविस्तर माहिती मिळते, तेव्हा त्यांची खरी परिस्थिती कळते. रुग्णाची भावनिक आंदोलने, त्याचे स्वभावबदल समजून घेण्यास कुटुंबीयांना यामुळे मदत होते. कोणत्याही मानसिक आजारात कुटुंबाची साथ खूप महत्त्वाची असते. आधार गटामध्ये एकाच प्रकारच्या मानसिक समस्या असणाऱ्या व्यक्तींनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी एकत्र येऊन शिकणे महत्त्वाचे आहे.

या आजाराचे स्वरूप, त्याची लक्षणे, उपचार आणि कुटुंबीयांची भूमिका या विषयी आणि या मानसिक आजारातून सावरायचे कसे या विषयी साध्या-सोप्या भाषेत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके, ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ विद्याधर वाटवे आणि डॉ. सुजल वाटवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा आधार गट सुरू करण्यात आला आहे. या गटाचा उद्देश समाजात बायपोलर मूड डिसऑर्डर या मानसिक आजाराबद्दल जनजागृती करणे हा आहे. नियमित औषधे, योग्य मार्गदर्शन आणि आधार गटाची मदत यामुळे रुग्णाला भावनिक समतोल साधण्यास मदत होते, असे राजपूत यांनी नमूद केले.

हेही वाचा : वयाच्या ३० वर्षांनंतरच्या महिलांनी ‘या’ आरोग्य चाचण्या अवश्य करा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समतोलची ११ जानेवारीला पहिली सभा

समतोल आधार गटाची पहिली सभा गुरुवारी (ता. ११) दुपारी चार ते सहा या वेळेत निवारा वृद्धाश्रम (नवी पेठ, पुणे) येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी संकेतस्थळ http://www.samtol.org येथे भेट द्यावी अथवा हेल्पलाइन क्रमांक वीरेन राजपूत ९६३७५२६५३७ आणि मीना राजपूत ८७९३२७८९६७ येथे संपर्क साधावा.