लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शिक्षण हक्क कायद्यातंर्गत शाळांना देण्यात येणारे अनुदान मंजुरीसाठी १२ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या प्राथमिक शिक्षण संचालनायातील मुख्य लिपिक महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. शासकीय मध्यवर्ती इमारतीच्या आवारात ही कारवाई करण्यात आली.

सुनीता रामकृष्ण माने (वय ४६) असे लाचखोर महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. शासकीय मध्यवर्ती इमारतीच्या आवारात प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे कार्यालय आहे. माने मुख्य लिपिक आहे. तक्रारदाराच्या कायम विनाअनुदानित प्रकारच्या दोन शाळा आहेत. पहिली ते बारावीपर्यंत वर्ग शाळेत आहे. तक्रारदारांच्या शाळेत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात ‘आरटीई’ अंतर्गत प्रवेश दिला जातो. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क शासनाकडून येणे होते. एकूण मिळूण १२ लाख ६९ हजार रुपये शुल्क येणे होते.

आणखी वाचा-‘कसब्या’त ब्राह्मण उमेदवार हवा, विविध ब्राह्मण संघटनांची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आठ आठवड्याच्या कालावधीत रक्कम ही संबंधित संस्थाचालकांना देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ऑगस्ट २०२४ मध्ये दिले होते. ही रक्कम तक्रारदारांना अदा करण्याचे आदेश नाशिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले होते. मुख्य लिपिक माने हिने या रक्कमेवर एक टक्का लाच देण्याची मागणी केली. तक्रारदार संस्थाचालकाने याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली. बुधवारी शासकीय मध्यवर्ती इमारतीच्या आवारात तक्रारदाराकडून लाच घेताना मानेला पकडण्यात आले. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक डाॅ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक दयानंद गावडे, अनिल कटके यांनी ही कारवाई केली.