शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार शरद जोशी यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून आलेल्या हजारो शेतकऱ्यांनी साश्रूपूर्ण नयनांनी आपल्या लढवय्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. यावेळी सर्वांनी ‘शरद जोशी अमर रहे’ अशा घोषणा दिल्या. श्रेया शहाणे आणि डॉ. गौरी जोशी या शरद जोशी यांच्या दोन्ही कन्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होत्या.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, शेतकऱ्यांचे नेते रघुनाथ पाटील, पाशा पटेल यावेळी उपस्थित होते. शरद जोशी यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी नदीपात्रात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तिथे अनेक शेतकऱ्यांनी शरद जोशी यांचे अंत्यदर्शन घेतले. दुपारी दोनच्या सुमारास त्यांची अंत्ययात्रा भिडे पूल येथून सुरू होऊन लक्ष्मी रस्त्याने अलका-टिळक चौकमार्गे वैकुंठ स्मशानभूमीत पोहोचली. तिथे पोलीस दलाकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर वैकुठ स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शरद जोशी यांचे गेल्या शनिवारी दीर्घ आजाराने बोपोडी येथील निवासस्थानी निधन झाले.