पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा १०, तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी याबाबत प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली. फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी, इयत्ता दहावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत. या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक १३ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर आता अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
इयत्ता बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत, तर माहिती-तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत घेतली जाणार आहे.
दहावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत, तर शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र आणि गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २ ते १८ फेब्रुवारी या दरम्यान होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
परीक्षांचे दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक ‘http://www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर ३१ ऑक्टोबरपासून उपलब्ध करून देण्यात आले आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी. अन्य संकेतस्थळावरील, अन्य यंत्रणेने छपाई केलेले, समाजमाध्यमे किंवा तत्सम माध्यमातील वेळापत्रक ग्राह्य धरू नये. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही नमूद करण्यात आले.
असे असेल वेळापत्रक
– इयत्ता बारावीची लेखी परीक्षा : १० फेब्रुवारी ते १८ मार्च
– माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या कालावधीत.
– दहावीची लेखी परीक्षा : २० फेब्रुवारी ते १८ मार्च
– शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र आणि गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत.
– राज्य मंडळाने दिलेली विशेष सूचना : मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल.
