पुणे : येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात एक कोटी २४ लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला असून, आरोग्य विभागाने नेमलेल्या पाच सदस्यीय चौकशी समितीने तसा अहवाल दिला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधिमंडळात दिली.
येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील सोलार प्रकल्प, व्यसनमुक्ती केंद्र, पुनर्वसन केंद्र, सफाई व्यवस्था, कपडेखरेदी, रुग्णआहार आणि किरकोळ साहित्य खरेदीत हा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आबिटकर यांनी सांगितले. या संदर्भात आमदार भीमराव तापकीर, शंकर जगताप, सुनील कांबळे, डाॅ. आशिष देशमुख यांनी सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे विचारणा केली होती.
सरकारी निधीचा अपहार, वित्तीय अधिकारांच्या मर्यादांचे उल्लंघन, नियमबाह्य देयकांचे वितरण, करारनाम्यातील अटींकडे दुर्लक्ष आणि सफाई सेवा पुरवठादारांना किमान वेतन, तसेच भविष्य निर्वाह निधीची खातरजमा न करता देयक देण्यात आल्याचा ठपकाही चौकशी समितीने अहवालात ठेवल्याचे आबिटकर यांनी सांगितले.
आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारी आणि प्राथमिक चौकशी अहवालाच्या अनुषंगाने विभागीय चौकशीचा प्रस्ताव क्षेत्रीय कार्यालयाकडून मागविण्यात आला आहे. सद्य:स्थितीमध्ये वैद्यकीय अधीक्षकांचा कार्यभार उपअधीक्षकांना देण्यात आला आहे. तसेच मनोरुग्णालयाची देयके उपसंचालक यांच्या स्तरावर तपासणी करून देण्यासंदर्भात वैद्यकीय अधीक्षकांना सांगण्यात आल्याची माहितीही आबिटकर यांनी दिली.