लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: कोंढव्यातील साळुंके विहार रस्त्यावरील एमएनजीएलच्या वाहिनीतून गॅसगळती होऊन आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. गॅसगळतीमुळे साळुंके विहार परिसरातील गॅस पुरवठा काही काळ बंद ठेवण्यात आला होता.
आणखी वाचा-खासगी बस नको रे बाबा! समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर प्रवाशांनी फिरवली पाठ
साळुंके विहार रस्ता परिसरात एमएनजीएलकडून गॅस पुरवठा करण्यात येतो. या भागात गॅसपुरवठा करणाऱ्या वाहिनीतून गॅसगळती सुरू झाली. गॅसगळतीमुळे वाहिनीने पेट घेतला. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविण्यात आली. कोंढवा अग्निशमन दल केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. या घटनेची माहिती एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आली. एमएनजीएलच्या तंत्रज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन गॅसपुरवठा बंद केला. गॅसवाहिनीची दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दुरुस्तीनंतर या भागातील गॅसपुरवठा सुरळीत झाला, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.
