पुणे : गुरुवार पेठेतील एका सोसायटीत पहाटे आग लागली. तळमजल्यावर असलेल्या वीज मीटर , तसेच दुचाकींनी पेट घेतल्याने सोसायटीत मोठ्या प्रमाणावर धूर झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन सोसायटीतील ४६ रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे गंभीर दुर्घटना टळली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाली नाही.

गुरुवार पेठेत झेबा शेल्टर्स सोसायटीतील तळमजल्यावर बुधवारी (३ सप्टेंबर) पहाटे साडेतीनच्या सुमारास वीज मीटर, तसेच दुचाकींनी पेट घेतला. तळमजल्यावर दुचाकी, वीज मीटरला आग लागल्याने मोठ्या प्रमाणावर धूर झाला. आग भडकल्याने रहिवासी घाबरले. त्यांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा मारा करुन दहा ते पंधरा मिनिटात आग आटोक्यात आणली.

सोसायटीत मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने रहिवासी घाबरले होते. जवानांनी सोसायटीतील ४६ रहिवाशांना बाहेर काढले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीमागचे कारण समजू शकले नाही. शाॅर्टसर्किट झाल्याने आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच खडक पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. अग्निशमन दलाचे अधिकारी प्रशांत गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवान अतुल मोहिते, अजिम शेख, सुधीर नवले, तेजस पटेल, सागर शिर्के, यश वीरकर यांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली.

पेटता दिवा पडल्याने सदनिकेत आग

नऱ्हे भागातील एका सोसायटीतील सदनिकेत गणपतीच्या मूर्तीसमोर लावलेला पेटता दिवा पडल्याने आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी सदनिकेत अडकलेल्या एका ज्येष्ठ महिलेची सुटका केली. नऱ्हे भागातील कॅनाॅल रस्त्यावरील सुंदर संस्कृती सोसायटीतील सदनिकेत गणेशोत्सवानिमित्त सजावट केली होती. सदनिकेत कुमुद बरसावले (वय ७०) एकट्या होत्या. दिवा पडल्याने सजावटीचे साहित्य पेटले. सदनिकेत मोठ्या प्रमाणावर धूर झाला. या घटनेची माहिती मिळताच नऱ्हे अग्निशमन केंद्रातील जवान नरेश पांगारे, गोगावले, नितीन भोवड, आकाश शिंदे यांनी धाव घेतली. सोसायटीतील अग्निशमन यंत्रणेचा वापर करुन सदनिकेतील आग आटोक्यात आणली. आगीमुळे सजावट साहित्य जळाले. आग पूर्णपणे आटोक्यात आल्यानंतर जवान तेथून रवाना झाले.