नाणार येथील तेल शुद्धीकरण कारखाना, वाढवण बंदर, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन आणि आरेमधील कारशेड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना कुणी विरोध केला? हे प्रकल्प रखडल्याने देशाचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. याबाबत महाविकास आघाडीने उत्तरे द्यावीत. मगच वेदान्तबाबत प्रश्न विचारावेत, अशा शब्दांत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महाविकास आघाडीला शनिवारी पुण्यात आव्हान दिले.

हेही वाचा >>> पुणे : वेदान्ताबरोबर केलेल्या कराराची प्रत, जागेचा शासन निर्णय दाखवा ; भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिआव्हान

विधान भवन येथे केंद्रातील योजनांचा पुणे जिल्ह्यातील आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘आपले अपयश झाकण्यासाठीच विरोधकांकडून वेदान्तचा मुद्दा तापविण्यात येत आहे. रत्नागिरीतील तेल शुद्धीकरण कारखाना, वाढवण बंदर, बुलेट ट्रेन आणि कारशेड या प्रकल्पांना आतापर्यंत कुणी विरोध केला. जपानकडून स्वस्त कर्ज बुलेट ट्रेनसाठी मिळणार होते. तसेच कारशेडला विलंब झाल्याने चार हजार कोटी रुपयांनी प्रकल्पाची किंमत वाढली आहे. केवळ पंतप्रधान मोदी यांना श्रेय मिळेल, म्हणून बुलेट ट्रेन प्रकल्पाला विरोध होत आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा नाणार येथील तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे. तरीदेखील या प्रकल्पांना विरोध कुणी केला?, या प्रश्नांची उत्तरे महाविकास आघाडीने आधी द्यावीत, त्यानंतर वेदान्तबाबत प्रश्न उपस्थित करावेत.’

हेही वाचा >>> शाश्वत विकासाची उद्दिष्टे विकास प्रक्रियेच्या केंद्रस्थानी ठेवावीत – मुख्यमंत्री

पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि केंद्राच्या योजनांचा कितपत लाभ झाला याचा आढावा घेण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघाचा तीन दिवस दौरा केला. केवळ बारामतीच नव्हे, तर देशातील प्रत्येक मतदारसंघ भाजपसाठी प्रतिष्ठेचा आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे राजकीय चष्म्यातून पाहू नये, असेही सीतारामन यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवारांना टोला
आजवर सहकार क्षेत्रावर आपली राजकीय पोळी भाजून घेणारे केंद्रात सत्तेवर असताना सहकारसाठी स्वतंत्र मंत्रालय का केले नाही? असा सवाल करत विरोधकांनी सहकार क्षेत्राचा केवळ राजकारणासाठी वापर केला, अशा शब्दांत केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी शरद पवार यांचे नाव न घेता टोला लगावला. तसेच पंतप्रधान मोदींनी सहकार क्षेत्रातील सुधारणांसाठीच स्वतंत्र मंत्रालय केले असून सहकार क्षेत्राला करातून सवलत देऊन दिलासा दिला आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.