पुणे : शहरात पावसाला सुरुवात झाल्यापासून डेंग्यूची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. जुलैमध्ये संशयित रुग्णांची संख्या ११० वर पोहोचली असून, त्यातील १२ जणांना डेंग्यूचे निदान झाले आहे. यंदा पहिल्यांदाच एका रुग्णाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची नोंद या महिन्यात झाली आहे. वर्षभरात आतापर्यंत डेंग्यूची रुग्संख्या ५८२ वर गेली आहे.

पुणे महापालिकेच्या हद्दीत जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून डेंग्यू रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. यंदा जानेवारी ते जून या कालावधीत डेंग्यूचे ४७२ संशयित रुग्ण आढळले आणि त्यातील २१ जणांना डेंग्यूचे निदान झाले. डेंग्यूचे निदान झालेले सर्व रुग्ण जानेवारी ते मार्च या कालावधीत सापडले होते. एप्रिल ते जून या कालावधीत डेंग्यूचे निदान झालेला एकही रुग्ण सापडला नव्हता. मे महिन्यात डेंग्यूचे २७ संशयित रुग्ण होते. जून महिन्यात त्यांची संख्या ५४ वर पोहोचली आहे. आता जुलैमध्ये ही संशयित रुग्णांची संख्या ११० झाली असून, त्यातील १२ जणांना डेंग्यूचे निदान झाले आहे, अशी माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.

हेही वाचा – धक्कादायक..! मुलगा न झाल्याने जुळ्या मुलींचा खून; वडिलांसह चौघांवर गुन्हा

जुलै महिन्यात डेंग्यूने एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. वर्षभरात प्रथमच डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाने केली आहे. याच वेळी चिकुनगुन्याचा एक रुग्ण आढळला आहे. आतापर्यंत वर्षभरात चिकुनगुन्याचे एकूण ३ रुग्ण सापडले आहेत. डासोत्पत्ती स्थाने आढळल्याप्रकरणी जुलैमध्ये ५४ निवासी आणि व्यावसायिक आस्थापनांना नोटीस बजावण्यात आल्या असून, त्यांच्याकडून ३० हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वर्षभरात अशा प्रकारच्या ५४७ नोटिसा बजावण्यात आल्या असून, एकूण १ लाख २३ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – लोणावळ्यात धो धो… ४८ तासांत ४३४ मिलिमीटर पावसाची नोंद

नागरिकांनी अशी घ्यावी काळजी…

  • आपल्या घरातील व सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवा.
  • घरभोवतालच्या नारळाच्या करवंट्या, रिकाम्या बादल्या नष्ट करणे.
  • वापरात नसलेले टायर झाकून ठेवणे अथवा त्यांची विल्हेवाट लावणे.
  • कूलर, फ्रिज यातील पाणी आठवड्यातून किमान एकदा बदलणे.
  • पूर्ण अंग झाकेल असे कपडे वापरावेत.