पिंपरी : उत्खनन यंत्र जप्त करण्याची आवश्यकता नसल्याचे बँकेने सांगितल्यानंतरही ते जप्त करून शशांक हगवणेच्या ताब्यात देणाऱ्या तिघांना म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्यामुळे या फसवणूक प्रकरणात वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी, वैष्णवीचा पती शशांक आणि सासू लता यांच्यासह पाच जणांना अटक झाली.m योगेश राजेंद्र रासकर (वय २५, रा. तळेगाव ढमढेरे), गणेश रमेश पोतले (वय ३०, रा. मोहितेवाडी) आणि वैभव मोहन पिंगळे (वय २७, रा. तळेगाव ढमढेरे) अशी अटक केलेल्या अन्य आरोपींची नावे आहेत. प्रशांत अविनाश येळवंडे (वय ३३, रा. निघोजे, ता. खेड) यांनी २९ मे रोजी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार ही कारवाई झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लता हगवणेच्या नावावर असलेले यंत्र येळवंडे यांनी खरेदी करण्याचा व्यवहार ठरला. यंत्राच्या बँक कर्जाच्या हप्त्याची दरमहा ५० हजार रुपयांची रक्कम येळवंडे शशांकला देत होते. मात्र, शशांकने त्यातून हप्ते न भरता, उलट वसुली व्यक्तींना हाताशी धरून येळवंडे यांच्याकडून यंत्र काढून स्वत:च्या ताब्यात घेतले. यात येळवंडे यांना ११ लाख ७० हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला. या संदर्भात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी न्यायालयीन कोठडीतून शशांक आणि लता या दोघांना ताब्यात घेतले. दोघेही पोलीस कोठडीत आहेत.
दरम्यान, ‘या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी संबंधित बँकेच्या कायदा व्यवस्थापकांकडे चौकशी केली. तेव्हा, या गुन्ह्यातील यंत्र ताब्यात घेण्याबाबत वसुली करणाऱ्या कोणत्याही लोकांना सूचना दिल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. असे असताना रासकर, पोतले आणि पिंंगळे या तिघांनी येळवंडे यांच्या चालकाकडून बेकायदा पद्धतीने यंत्र घेऊन ते शशांकच्या ताब्यात दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार या तिघांनाही अटक केली आहे,’ अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिली.