scorecardresearch

Premium

‘फिटनेस’च्या जनजागृतीसाठी एफटीआयआयचा म्युझिक व्हिडिओ

१५ ऑगस्टला प्रदर्शित होणार

‘फिटनेस’च्या जनजागृतीसाठी एफटीआयआयचा म्युझिक व्हिडिओ

राज्यवर्धनसिंग राठोड यांच्या ‘फिटनेस चॅलेंज’ला प्रतिसाद; १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार

केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी सुरू केलेल्या ‘फिटनेस चॅलेंज’चे वारे राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेपर्यंत (एफटीआयआय) येऊन पोहोचले आहेत. एफटीआयआयने फिटनेसबाबत जनजागृती करणारा ‘हम फिट तो इंडिया फिट’ हा म्युझिक व्हिडिओ तयार केला असून, स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) हा म्युझिक व्हिडिओ समाजमाध्यमांद्वारे प्रदर्शित केला जाणार आहे. संस्थेने पहिल्यांच राष्ट्रीय जनजागृतीसाठी म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे.

काही दिवसांपूर्वी राज्यवर्धनसिंग राठोड यांनी आपल्या कार्यालयात जोर मारल्याचा व्हिडिओ ट्विटरवर अपलोड करून ‘फिटनेस चॅलेंज’ची सुरुवात केली होती. त्यानंतर देशभरात फिटनेस चॅलेंजचा जोर सुरू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्यासह अनेकांनी फिटनेस चॅलेंजचे व्हिडिओ केले. एफटीआयआयचे अध्यक्ष अनुपम खेर यांनीही त्यात सहभाग घेतला होता. या पाश्र्वभूमीवर, एफटीआयआयने सर्जनशीलपद्धतीने प्रतिसाद देण्याचा निर्णय घेत थेट म्युझिक व्हिडिओच तयार केला आहे. म्युझिक व्हिडिओतील ‘हम फिट तो इंडिया फिट’ या गीतामध्ये मराठी, हिंदी, गुजराती आदी भाषा वापरण्यात आल्या आहेत. प्रसिद्ध गायक जसराज जोशी यांनी हे गीत गायले आहे. संजय सेन यांनी लिहिलेले गीत रोहित मुलमुले, शुभम घाटगे, अनुराग पंत यांनी संगीतबद्ध केले आहे. सुमीत गुप्ता यांनी संकलन आणि मिलिंद दामले यांनी दिग्दर्शन केले आहे.  ‘माहिती आणि प्रसारणमंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी सुरू केलेल्या फिटनेस चॅलेंजला प्रतिसाद म्हणून हा म्युझिक व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. संस्थेअंतर्गत या व्हिडिओची निर्मिती करण्यात आली आहे. दोन दिवसांत चित्रीकरण करून, त्यावर निर्मित्योत्तर प्रक्रिया करून स्वातंत्र्यदिनी तो समाजमाध्यमांमध्ये प्रदर्शित केला जाईल. या व्हिडिओद्वारे राष्ट्रीय स्तरावर तंदुरुस्तीबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न आहे,’ असे संस्थेचे कुलसचिव वरुण भारद्वाज यांनी सांगितले.

संस्थेच्या ‘ब्रँडिंग’ची कल्पना

म्युझिक व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध माध्यमांचा वापर केला जाणार आहे. त्यात फेसबुक, ट्विटर, युटय़ूब आदी समाजमाध्यमांसह दूरदर्शनचीही मदत घेतली जाणार आहे. हा व्हिडिओ दूरदर्शनवर दाखवण्याचेही नियोजन आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून संस्थेमध्ये असलेल्या अत्याधुनिक सोयीसुविधा मांडण्याची, संस्थेचे ‘ब्रँडिंग’ करण्याचीही कल्पना आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Flash mob on physical fitness in ftii

First published on: 12-08-2018 at 05:31 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×