जी-२० परिषदेतील बैठकांसाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांना सांस्कृतिक कार्यक्रमातून मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात ढोल-लेझीमच्या तालावर ठेका धरण्याचा मोह पाहुण्यांनाही आवरला नाही. त्यांनीही ढोल, लेझीम, टाळ हाती घेत महाराष्ट्राच्या संस्कृतीला दाद दिली.

हेही वाचा >>> ‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने राष्ट्रवादीकडून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जी-२० बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींचे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केले. केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या आर्थिक घडामोडी या विभागाचे संयुक्त सचिव सॉलोमन अरोकिराज, विभागीय आयुक्त सौरभ राव, कुलगुरू डॉ. कारभारी काळे, पुणे महानरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमात भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट्सच्या कलाकारांनी ‘सागा ऑफ मराठा एम्पायर’ या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवणाऱ्या कलांचे सादरीकरण केले. शिववंदना, मर्दानी खेळ, पोतराज, वाघ्या-मुरळी, गोंधळ, छक्कड, संकेतभाषा कला असलेली करपल्लवी यासह नरवीर तान्हाजी मालुसरे यांना समर्पित सादरीकरण करण्यात आले. तसेच शिवराज्याभिषेक गीताच्या सादरीकरणाला जोरदार दाद मिळाली. कार्यक्रमाच्या अखेरीस झालेल्या ढोलताशा, लेझीम सादरीकरणावेळी परदेशी पाहुणेही त्यात सहभागी झाले आणि त्यांनी कलाकारांना दाद देत ढोल ताशाच्या गजरावर ठेका धरला.