पुणे : ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील संरक्षण, पोलीस, गुप्तचर यंत्रणा यांवर अधिक माहिती समोर यायला हवी. त्यावर आधारलेल्या अभ्यासक्रमाचा वापर प्रशिक्षणासाठी करता येईल,’ असे मत माजी पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी गुरुवारी व्यक्त केले.
‘कवी अनिल यांनी म्हणल्याप्रमाणे ‘सारेच दीप कसे मंदावले आता,’ अशी समाजाची अवस्था झाली आहे. पोलीस, जवानांवरसुद्धा प्रचंड मेहनत करण्याची गरज आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा दुसरे कोणतेही चरित्र एवढे परिणामकारक ठरणार नाही,’ असेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
मृत्युंजय प्रतिष्ठान आणि ‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत स्मृती समिती यांच्या वतीने कुलकर्णी यांच्या हस्ते इतिहासाचे अभ्यासक, लेखक डॉ. केदार फाळके यांना ‘‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत स्मृती साहित्य पुरस्कारा’ने, तर वानवडी येथील दिव्यांग कल्याणकारी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र हिरेमठ यांना ‘‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत स्मृती समाजकार्य पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. डॉ. सागर देशपांडे, मृणालिनी शिवाजीराव सावंत, अमिताभ सावंत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात डॉ. केदार फाळके यांनी ‘वर्तमानकाळासाठी शिवचरित्र’ या विषयावर भाष्य केले.
‘आपण वाचन करण्याची आवश्यकता आहे. तरुण पिढीमध्ये वाचनाची सवय रुजवायला हवी. वाचनाने आपण समृद्ध होत असतो,’ असे कुलकर्णी यांनी सांगितले. शिवाजी सावंत यांच्या कार्याची दखल घेताना ते म्हणाले, ‘सिनेमा, कादंबरी अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये लिहित असताना वेगवेगळी आव्हाने असतात. सावंत यांनी सर्व प्रकारचे लेखन केले. त्यांनी काळाच्या पुढे जाऊन विचार केला. दूरदृष्टीने साहित्याची निर्मिती केली. त्यांच्या या कार्याची नोंद घ्यायला हवी. शिवाजी सावंत यांचे सर्व साहित्य अत्यंत प्रेरणादायी आहे.’
इतिहासाचा विपर्यास करण्यासाठी स्टॅटिस्टिक्सचा वापर केला जातो. राज्याबाहेरच्या एका विद्यापीठाचा वेगळ्या अर्थाने इतिहास सांगण्यात मोठा दबदबा आहे. अशा प्रयत्नांना बळी न पडता प्रामाणिकपणे संशोधन करायला हवे. मूळ साधनांपर्यंत पोहचले पाहिजे. त्यासाठी संशोधकाला भाषेचेही ज्ञान असायला हवे. – डॉ. केदार फाळके, इतिहास अभ्यासक