पुणे : ‘राजकीय आयुष्याच्या वाटचालीत नक्की कोण कोणाचा प्रतिस्पर्धी हे सांगणे अवघड असते. कोण कोणाला कधी धोबीपछाड करेल, हे सांगता येत नाही. कुस्तीप्रमाणेच राजकारणातही डावपेच आणि डाव-प्रतिडाव सुरू असतात,’ असे विधान राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी येथे केले. कै. पै. वसंतराव सयाजी बेनकर प्रतिष्ठानातर्फे कै. पै. वसंतराव सयाजी बेनकर यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित जिल्हा आणि तालुकास्तरीय निमंत्रित मुलींच्या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. प्रतिष्ठानाच्या संस्थापक अध्यक्ष वैजयंती बेनकर, सारिका डोके, दुर्गा बोरावके, गौरी पिंगळे, ॲड. मंगेश ससाणे, रोहिणी रासकर, सुनीता भगत, संध्या बेनकर, अक्षय पिंगळे, अक्षय बेनकर, भाऊसाहेब डोके, राजेंद्र बोरावके या वेळी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, ‘मुलगा-मुलगी असा भेदभाव न करता मुलांप्रमाणेच मुलींनादेखील क्रीडा क्षेत्रात समान संधी मिळाल्यास त्या त्यांची चुणूक दाखवून देतात. लहान वयातच मुला-मुलींवर खेळांचे संस्कार झाल्यास ते ऑलिंपिकमध्ये पदक मिळविण्यापर्यंत मजल मारू शकतात. शहरांबरोबरच महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मुला-मुलींचे क्रीडा कौशल्य ओळखून त्यांना वेळीच प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. खेळांबरोबरच राजकारणात येणेदेखील आवश्यक आहे. मोदी सरकार २०२९ मध्ये विधानसभा आणि विधान परिषदेसाठी महिलांना ५० टक्के आरक्षण लागू करणार आहे. राजकीय घराण्यांचा धांडोळा घेतला असता, वडिलांचा राजकीय वारसा चालविणाऱ्या अनेक मुली आपल्याला सध्याच्या राजकारणात दिसून येतात. शरद पवार-सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक उदाहरणे आढळतात.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘महिलांनी महिलांसाठी घेतलेली राज्यातील पहिली नामांकित कुस्ती स्पर्धा आहे. ती केवळ स्पर्धा नसून, महिला खेळाडूंना समान संधी आणि मान्यता मिळावी यासाठीचा प्रयत्न आहे,’ असे वैजयंती बेनकर यांनी सांगितले.