पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहारा प्रकरणी गेले तीन वर्षे कारागृहात असलेले माजी आमदार अनिल भोसले यांना उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला. मात्र,या गुन्ह्यात पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी अटक केल्याने भोसले यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत सुमारे ४३६ कोटी ४४ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई केली. याप्रकरणी भोसले यांना तीन वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती. बँकेतील व्यवस्थापक, भोसले, बांदल यांच्यासह सातजणांविरुद्ध पोलिसांनी ६ सप्टेंबर २०२१ रोजी आठ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले. कट करून कर्जदार आणि गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये भोसले, बांदल , तसेच अन्य आरोपी कारागृहात होते. बांदल यांची काही महिन्यांपूर्वी जामिनावर मुक्तता झाली. भोसले यांचा जमीन सत्र न्यायालयाने चारवेळा फेटाळला होता. त्याविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने काही अटी शर्ती टाकून जामीन मंजूर केला.

हेही वाचा…आर्थिक वादातून तरुणाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ईडीने मंगळवारी बांदल यांच्या शिक्रापूर आणि महंमदवाडी येथील निवासस्थानांवर छापे टाकले. त्यांची १६ तास चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना रात्री अटक करून मुंबईला नेले. त्यांच्या चौकशीनंतर या पथकाकडून भोसले यांनाही चौकशीसाठी पाचारण करण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे भोसले अडचणीत सापडण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.