लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शेअर बाजारात गुंतवणूक, तसेच पोलीस कारवाईची भीती घालून सामान्यांची फसवणूक करण्याचे सत्र सुरू आहे. सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत दोन महिलांची ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सहकारनगर आणि विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पद्मावती भागातील एका महिलेची शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी २६ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेला शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले होते. महिलेने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी २६ लाख २५ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी महिलेला परतावा मिळाला, असे भासविले. महिलेने परताव्याबाबत विचारण केली. तेव्हा चोरट्यांनी प्रतिसाद दिला नाही. चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे तपास करत आहेत.

आणखी वाचा-डेक्कन भागात पोलिसांवर हल्ला करुन पसार झालेला चंदन चोरटा गजाआड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विमाननगर परिसरातील एका महिलेची सायबर चोरट्यांनी पोलीस कारवाईची भीती दाखवून २० लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला. मुंबई विमानतळावरुन दक्षिण कोरियात कुरिअरव्दारे एक पाकिट पाठविण्यात आले आहे. या पाकिटावर तक्रारदार महिलेचे नाव आहे. पाकिटात दोन पारपत्र, लॅपटॉप, अमली पदार्थ सापडले असून, याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. कारवाईची भीती दाखवून चोरट्यांनी महिलेला तातडीने बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. महिलेने शहानिशा न करता चोरट्यांच्या खात्यात २० लाख रुपये जमा केले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे तपास करत आहेत.