पुणे : नोकरीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी सिंहगड रस्ता भागातील एकाची ११ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एकाने सिंहगड रस्ता पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड रस्ता भागात राहायला आहेत. २१ एप्रिल रोजी सायबर चोरट्यांनी तक्रारदाराला ई- मेल पाठविला. एका बड्या कंपनीत नोकरीची संधी, असे आमिष चोरट्यांनी त्यांना ई-मेलद्वारे दाखविले होते. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी पैसे भरावे लागतील, असे सांगतिले. त्यानंतर चोरट्यांच्या बँक खात्यात सुरुवातीला तक्रारदाराने काही रक्कम पाठविली. चोरट्यांनी वेगवेगळी कारणे सांगून तक्रारदाराकडून गेल्या तीन महिन्यांत ११ लाख २५ हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने सिंहगड पोलीस ठाण्यात धाव घेतली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे तपास करत आहेत.