पुणे : व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने एका तरुणाची दहा लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी काेथरूड पोलिसांनी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका तरुणाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिघांंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार भूगाव परिसरात राहायला आहे. त्याचा कोथरूड परिसरात व्यवसाय आहे. आरोपींनी त्याला बनावट ई-मेल पाठवून खासगी वित्तीय संस्थेकडून व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते.
कर्ज मंजुरीची प्रक्रिया, तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागेल, असे सांगून त्याला जाळ्यात ओढले. तरुणाकडून ऑनलाइन पद्धतीने वेळोवेळी दहा लाख ४८ हजार रुपये घेतले. आरोपींच्या खात्यात पैसे जमा केल्यानंतर तरुणाने कर्जमंजुरीबाबत विचारणा केली. तेव्हा आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक धनवडे तपास करत आहेत.