पुणे: मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम केंद्रात हातचलाखी करून ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यातून ४८ हजार रुपये काढून घेत फसवणूक केल्याची घटना घडली. नवी पेठेतील शास्त्री रस्त्यावरील एका एटीएम केंद्रात हा प्रकार घडला. याप्रकरणी बद्रीनाथ शांतिनाथ बनसोडे (वय ४५, रा. पानमळा वसाहत, सिंहगड रोड) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ११ मे २०२५ रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शास्त्री रस्त्यावरील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. पैसे निघत नसल्याने ते थोडे गोंधळले. त्याचवेळी उपस्थित एकाने त्यांना ‘या मशीनमधून पैसे निघत नाहीत, दुसऱ्या मशीनमधून निघतात, मी मदत करतो’ असे सांगितले. त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून एटीएम कार्ड घेतले.
दुसऱ्या मशीनकडे वळल्याचा बनाव केला. परंतु, त्याने त्यांच्या कार्डाची दुसऱ्या कार्डाशी अदलाबदल केली आणि मूळ कार्ड लंपास केले. नंतर काही वेळातच बनसोडे यांच्या खात्यातून ४८ हजार रुपये काढल्याचा संदेश आला. तेव्हा त्यांना हा प्रकार लक्षात आला. पोलीस निरीक्षक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
ज्येष्ठाची साडेचार लाखांची फसवणूक
डेबिट कार्ड ॲक्टिव्ह करायचे असल्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाची साडेचार लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने चतु:शृंगी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरून अनोळखी व्यक्तींवर आयटी ॲक्ट आणि फसवणूक केल्याच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दूरध्वनीद्वारे संपर्क करून सायबर चोरट्यांनी तक्रारदारांना बँकेतून व्यवस्थापक बोलत असल्याची बतावणी केली. डेबिट कार्ड ॲक्टिव्ह करायचे आहे, असे सांगून त्यांना एक लिंक पाठवली. नंतर लिंकवर माहिती भरण्यास सांगितली. माहिती भरताच सायबर चोरट्यांनी ऑनलाइनरीत्या त्यांच्या खात्यातून चार लाख ४७ हजार रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली.