पुणे : सौंदर्योपचार शस्त्रक्रिया (प्लास्टिक सर्जरी) शिबिरामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या दिवंगत डॉक्टरच्या स्मरणार्थ २०० रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याचा उपक्रम संचेती रुग्णालयाकडून हाती घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आपल्या प्रिय सहकाऱ्यांच्या स्मृती जागवण्यासाठी अमेरिकेतील काही नामांकित शल्यविशारदही या शिबिरामध्ये सहभागी झाले आहेत.

डॉ. शरदकुमार दीक्षित, असे या दिवंगत डॉक्टरचे नाव आहे. प्लास्टिक सर्जरी क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट भारतीय शल्यविशारद म्हणून डॉ. दीक्षित यांचे नाव जगप्रसिद्ध होते. त्यांनी केलेल्या मानवतावादी कामासाठी जगातील अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते. डॉ. दीक्षित यांचे २०११ मध्ये निधन झाले.

हेही वाचा – पुणे: येशूचं रक्त म्हणून द्राक्षाचं पाणी देऊन आळंदीत धर्मांतराचा प्रयत्न; धक्कादायक प्रकारानंतर गुन्हा दाखल!

संचेती रुग्णालय, भारतीय जैन संघटना आणि चांदमल मुनोत ट्रस्टतर्फे या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अमेरिकेतील कुशल प्लास्टिक शल्यविशारद डॉ. लॅरी वाइनस्टाइन आणि त्यांचे सहकारीही या शिबिरासाठी संचेती रुग्णालयात आले आहेत. संचेती रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. पराग संचेती, महाव्यवस्थापक राहुल चौबे आणि शिबिराचे आयोजक शशिकांत मुनोत यांच्या उपस्थितीत गुरुवारी या शिबिराला सुरुवात झाली. पुढील दोन दिवसांत २०० वंचित रुग्णांवर या शिबिरामध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

शिबिरासाठी सुमारे ५०० रुग्णांनी नावनोंदणी केली होती. दुभंगलेले ओठ, टाळू, नाक, भुवया, कान असे जन्मजात दोष असलेल्या व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन जगण्यात अनेक आव्हानांचा, तसेच सामाजिक अवहेलनेचा सामना करावा लागतो. मात्र, प्लास्टिक सर्जरीचा खर्च सगळ्यांनाच परवडतो असे नाही. त्यामुळे अशा रुग्णांसाठी मोफत शिबिराची कल्पना डॉ. शरदकुमार दीक्षित यांनी प्रत्यक्षात आणली. गेली २९ वर्षे हा उपक्रम सुरू आहे. डॉ. दीक्षित यांच्या पश्चात आता त्यांचे अमेरिकन सहकारी हा उपक्रम पुढे नेत आहेत.

हेही वाचा – पुणे : बांधकाम व्यावसायिकाकडून उकळली २६ लाखांची खंडणी, चतु:शृंगी पोलिसांकडून चौघांविरोधात गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. पराग संचेती म्हणाले, दिवंगत सहकाऱ्याच्या कामातून प्रेरणा घेऊन असे काम करणे हे कौतुकास्पद आहे. डॉ. दीक्षित यांच्याबरोबर अशी अनेक शिबिरे आम्ही केली. त्यांचा वारसा पुढे चालवताना निम्न आर्थिक स्तरातील रुग्णांना कायमस्वरुपी उपचार देण्याचे समाधान आहे, असेही डॉ. संचेती म्हणाले.