पुणे : गेल्या आठ दिवसांपासून भक्तिभावाने गणेशाची सेवा केलेल्या कार्यकर्त्यांना आता वाजत-गाजत निघणाऱ्या वैभवशाली मिरवणुकीने गणरायाला भावपूर्ण निरोप देण्याचे वेध लागले आहेत. महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून शनिवारी (६ सप्टेंबर) सकाळी साडेनऊ वाजता विसर्जन मिरवणुकीची सुरुवात होणार असून मानाच्या गणपती मंडळांची पथके निश्चित झाली आहेत. गणेश विसर्जनाच्या तयारीला वेग आला असून विसर्जन मिरवणूक थाटामाटात निघावी यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली आहे.

गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या उत्सवाची वैभवशाली सांगता करण्याच्या उद्देशातून वाजत-गाजत काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीने गणरायाला शनिवारी निरोप देण्याची जय्यत तयारी कार्यकर्त्यांकडून सुरू झाली आहे. राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अमाप उत्साह आहे.

श्री कसबा गणपती मंडळ

पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने सकाळी साडेनऊ वाजता पालखीतून निघणार आहे. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार असून मिरवणुकीत दोन ढोल-ताशा पथकांचा सहभाग आणि गणेशोत्सवाची माहिती देणारा विशेष रथ असेल. विविध सामाजिक संस्थांचा मिरवणुकीमध्ये सहभाग असेल.

श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ

ग्रामदेवता आणि मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाची मिरवणूक दरवर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने पालखीतून निघणार आहे. अब्दागिरी, मानचिन्हासह श्री गणराय विराजमान असलेली चांदीची पालखी कार्यकर्ते आपल्या खांद्यावरून वाहून नेणार आहेत. नगरावादनाचा गाडा अग्रभागी असून मिरवणुकीत ढोल-ताशा पथकांचे वादन होणार आहे.

गुरुजी तालीम मंडळ

फुलांनी सजविलेल्या ‘हर हर महादेव’ रथातून श्री गुरुजी तालीम मंडळ या मानाच्या तिसऱ्या गणपतीची मिरवणूक निघणार आहे. सुभाष सरपाले आणि स्वप्निल सरपाले यांनी हा रथ साकारला आहे. नगारा वादनाचा गाडा मिरवणुकीच्या अग्रभागी असून ढोल-ताशा पथकांचे वादन होणार आहे.

श्री तुळशीबाग मंडळ

शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा करणाऱ्या श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट या मानाच्या चौथ्या गणपती मंडळाने विसर्जन मिरवणुकीसाठी मयूर रथ साकारला आहे. रथ ३५ फूट उंच असून फुलांची आकर्षक सजावट करण्यात येणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता सुरू होणाऱ्या मिरवणुकीमध्ये महिला आणि परिसरातील व्यापारी सहभागी होणार आहेत. लोणकर बंधू यांचा नगारावादनाचा गाडा मिरवणुकीच्या अग्रभागी असून ढोल-ताशा पथकांचा सहभाग असेल.

केसरीवाडा गणेशोत्सव

महात्मा फुले मंडईतील लोकमान्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून केसरीवाडा गणेशोत्सव या मानाच्या पाचव्या गणपतीच्या मिरवणुकीला सकाळी साडेनऊ वाजता सुरुवात होईल. ‘कथकली मुखवट्याच्या’ परंपरेप्रमाणे फुलांनी सजविलेल्या पालखीतून गणरायाची मिरवणूक निघणार असून मिरवणुकीत श्रीराम, शिवमुद्रा, स्वराज्य ट्रस्ट ढोल-ताशा पथके सहभागी होणार आहेत. ‘हरवलेला पोस्टमन’ ही स्वराज्य ट्रस्ट ढोल-ताशा पथकाची संकल्पना असेल. बिडवे बंधूचे नगारा वादन, इतिहासप्रेमी मंडळाचा छत्रपती शिवाजी महाराज समाधी जीर्णोद्धार हा देखावा असेल.

अखिल मंडई मंडळ

विद्युत रोषणाईने सजविलेल्या ‘श्री गणेश सुवर्णयान’ रथातून अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची विसर्जन मिरवणूक सायंकाळी सहा वाजता सुरू होणार आहे. जहाजासारखे स्वरूप असलेल्या रथाचा आकार २५ फूट लांब आणि १६ फूट रुंद असेल. जहाजाच्या वर सर्च लाईट आणि आकर्षक रोषणाईही असेल. कलादिग्दर्शक विशाल ताजणेकर यांनी रथ साकारला आहे. मिरवणुकीच्या अग्रभागी जयंत नगरकर यांचा नगारावादनाचा गाडा असून गंधर्व बँड तसेच शिवगर्जना ढोल-ताशा पथक सहभागी होणार आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट

आकर्षक रोषणाईने सजविलेल्या दक्षिण भारतीय शैलीतील ‘श्री गणनायक रथा’तून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुपारी चार वाजता बेलबाग चौकातून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. कलादिग्दर्शक विनायक रासकर यांनी हा रथ साकारला आहे. मानवसेवा रथ आणि सनई-चौघडावादनाचा गाडा मिरवणुकीच्या अग्रभागी असेल. ‘स्व-रूपवर्धिनी’चे पथक, केरळचे चेंदा मेलम पथक असा लवाजमा असेल.