पुणे : ‘विसर्जन मिरवणूक सोहळा लवकर पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. दर वर्षी विसर्जन मिरवणुकीला सकाळी साडेदहा वाजता प्रारंभ होतो. यंदा एक तास आधी म्हणजे सकाळी साडेनऊ वाजता मिरवणूक सुरू होणार आहे,’ असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
मानाचे पाचही गणपती दुपारी १२ वाजेपर्यंत बेलबाग चौकात मार्गस्थ झाले असतील, असे नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, दुपारी चारच्या सुमारास श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ बेलबाग चौकातून मुख्य मिरवणुकीत सहभागी होईल. तसेच, सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जिलब्या मारुती मंडळ, हुतात्मा बाबू गेनू मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळ आणि अखिल मंडई मंडळ मुख्य मिरवणुकीत सहभागी होतील, असाही पोलिसांचा प्रयत्न आहे.
पोलिसांचे वेळापत्रक
– विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ शनिवारी (६ सप्टेंबर) सकाळी पूजा झाल्यानंतर साडेनऊ वाजता होईल.
– मानाचा पहिला कसबा गणपती मंडळाचे मंडईतील टिळक पुतळा येथे आगमन होईल. पूजा झाल्यानंतर मुख्य मिरवणुकीला प्रारंभ होईल.
– मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळ सकाळी साडेदहा वाजता बेलबाग चौकातून मार्गस्थ होईल.
– मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती मंडळाचा गणपती पूजा आणि आरती झाल्यानंतर सकाळी अकराच्या सुमारास मार्गस्थ होईल.
– मानाचा चौथा तुळशीबाग गणपती मंडळ आणि मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती दुपारी बारापर्यंत बेलबाग चौकातून मार्गस्थ होतील.
– दुपारी एकपर्यंत महापालिकेचे गणपती मंडळ आणि त्वष्टा कासार गणपती मंडळ मिरवणुकीत सहभागी होतील.
– दुपारी चारच्या सुमारास श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ बेलबाग चौकातून मुख्य मिरवणुकीत सहभागी होईल.
– सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जिलब्या मारुती मंडळ, हुतात्मा बाबू गेनू मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळ आणि अखिल मंडई मंडळ मुख्य मिरवणुकीत सहभागी होतील.
– मानाची मंडळे सायंकाळी सातपर्यंत बेलबाग चौकातून मार्गस्थ होतील.
विद्युत रोषणाईची मंडळे सायंकाळी सातनंतर
विद्युत रोषणाई आणि विसर्जन मिरवणुकीत देखावा साकारणारी अन्य मंडळे सायंकाळी सातनंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतील. लक्ष्मी रस्ता आणि छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून येणारी सर्व मंडळे फक्त बेलबाग चौकातूनच मुख्य मिरवणुकीत प्रवेश करतील. मानाचा पहिला कसबा गणपती मंडळाने टिळक चौक पार करेपर्यंत अन्य कोणतेही मंडळ त्या चौकात प्रवेश करणार नाही, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
मंडळांसाठी अटी आणि सूचना
– विसर्जन मार्गावर ढोल-ताशा पथकांना स्थिर वादन करण्यास मज्जाव.
– प्रत्येक मंडळास जास्तीत जास्त दाेन ढोल पथकांना परवानगी, एका पथकात ६० सदस्य.
– मिरवणुकीत ध्वनिक्षेपक यंत्रणा किंवा ढोल पथकांचा समावेश, एकाच वेळी दोन पथकांना मनाई.
– मुख्य मिरवणुकीत अंतर ठेवू नये.
– मिरवणूक मार्गावर अन्य चौकातून प्रवेश करण्यास मंडळांना बंदी.
– ढोल-ताशा पथकांना लक्ष्मी रस्त्याने विरुद्ध येण्यास मनाई.
मानाच्या मंडळांसह अन्य मंडळांनी वेळ पाळण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे यंदा विसर्जन मिरवणूक शिस्तबद्धपणे पार पडेल, तसेच मिरवणुकीचा समाराेपही लवकर होईल.– अमितेश कुमार, पोलीस आयुक्त