Pune Ganesh Visranjan Update पुणे : नव्या तालांचे आवर्तन करीत झालेला ढोल-ताशांचा निनाद… बँडपथकातील कलाकारांनी वाजविलेल्या मधुर सुरावटी… पारंपरिक पालखीत आणि आकर्षक फुलांनी सजविलेल्या रथामध्ये विराजमान गणरायाच्या मूर्तीचे दर्शन घेताना भाविकांचे दर्शनासाठी नकळत जोडले जाणारे हात आणि छायाचित्र टिपण्यासाठी तरुणाईची उडालेली झुंबड… विविध राजकीय नेत्यांची उपस्थिती… पावसाने घेतलेली विश्रांती आणि उन्हाचे अभावानेच झालेले दर्शन… अशा उत्साही वातावरणात पुण्याच्या वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीस शनिवारी सुरुवात झाली. मिरवणूक एक तास लवकर सुरू झाली, तरी रेंगाळेल, की वेळापत्रक पाळेल, यांचे आडाखे बांधले जात असताना, मानाचा पहिला कसबा गणपती टिळक चौकात नियोजित वेळापत्रकाच्या १५ मिनिटे आधी आला!

श्रद्धा आणि भक्तिभावाने भारलेल्या गणेशोत्सवाच्या आनंद सोहळ्याच्या यंदाच्या सांगतेचा प्रारंभ शनिवारी वैभवशाली विसर्जन मिरवणुकीने झाला. महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह मानाच्या गणपतींना पुष्पहार अर्पण करून आरती झाल्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह विविध राजकीय पक्षनेते या वेळी उपस्थित होते. मान्यवरांनी श्री कसबा गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी या ग्रामदैवतांच्या नावाने असलेल्या मंडळांच्या गणरायाला पुष्पहार अर्पण करताच ढोलावर थाप पडली आणि ताशांच्या साथीने वादनाचा खेळ रंगला.

ढोल-ताशा पथकांचा सहभाग, विविध प्रबोधनपर संदेश देणारी पथके अशी कसबा गणपती मंडळाची मिरवणूक सुरू झाली. ढगाळ वातावरण आणि हवेत गारवा असल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. चांदीच्या पालखीत गणरायाची मूर्ती विराजमान झाली होती. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पालखी आपल्या खांद्यांवर वाहून नेली. अजित पवार, चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळही काही वेळ पालखीचे भोई झाले होते. तर, कडक शिस्तीचे असा लौकिक असलेल्या अजित पवार यांनी ढोल वादन करण्याचा आनंद लुटला.

वैविध्यपूर्ण तालवादन करणाऱ्या ढोल-ताशा पथकांनी तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या मिरवणुकीत रंग भरला. पारंपरिक चांदीच्या पालखीत विराजमान गणरायाची प्रसन्न मूर्ती पाहून भाविकांचे हात नमस्कारासाठी जोडले गेले. कार्यकर्त्यांनी मिरवणूक मार्ग संपेपर्यंत आपल्या खांद्यावरून पालखी वाहून नेली.

लक्ष्मी रस्त्यावर पहिल्यांदा गुलाल उधळणारे मंडळ असा लौकिक असलेल्या श्री गुरुजी तालीम मंडळाचा गणपती मिरवणुकीत सहभागी झाला. सुभाष सरपाले आणि स्वप्नील सरपाले यांनी फुलांची आकर्षक सजावट केलेल्या मयूर रथामध्ये गणरायाची मूर्ती विराजमान झाली होती. मुक्तहस्ते गुलालाची उधळण हेच या मिरवणुकीचे खास वैशिष्ट्य आणि आकर्षण ठरले. गणपती चौकात ढोल-ताशा पथकांचा तालाविष्कार अनुभवताना गणेशभक्त मंत्रमुग्ध झाले. मूषक वाहनावर विराजमान गणरायाच्या मूर्तीचे छायाचित्र टिपण्यासाठी सर्वांची लगबग सुरू होती.

शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा करणाऱ्या श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने देखणी मिरवणूक काढून गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. ढोल-ताशा पथकांचा नाद आणि बँडपथकतील कलाकारांचे वादन याने मिरवणुकीत रंग भरला.

नंतर केसरीवाडा हा मानाचा पाचवा गणपती मिरवणुकीत सहभागी झाला. मोबाइल आणि संगणकाच्या एका क्लिकवर माहिती पोहोचत असताना विसर्जन मिरवणुकीत स्वराज्य पथकाने ‘पोस्टमन’च्या आठवणींना उजाळा दिला. पोस्टमनच्या वेशातील वादक, लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित जिवंत देखावा आणि कार्यकर्त्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह अशा वातावरणात केसरीवाडा गणपतीचे  बेलबाग चौकात दिमाखात आगमन झाले.

दुपारी चारपर्यंत मानाचे सर्व गणपती मिरवणुकीत मार्गस्थ झाले होते. मानाचा पहिला कसबा गणपती डेक्कन जिमखान्यावरील टिळक चौकात नियोजित वेळापत्रकाच्या १५ मिनिटे आधी आला!