पुणे : ‘अपघात झाला तेव्हा मी त्या गाडीत नव्हते. माझी गाडी चालकाकडेच होती. अपघाताशी कोणताही संबंध नसताना मला जाणीवपूर्वक दोषी ठरवले जात आहे. आतापर्यंत मला कोणत्याही कारणावरून ट्रोल करण्यात येत होते. आता या अपघात प्रकरणातही हेच चालू आहे. कोणी काहीही बोलत आहे. माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे,’ अशी प्रतिक्रिया नृत्यंगणा गौतमी पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

नवले पुलाजवळ झालेल्या अपघात प्रकरणात गौतमी पाटील यांना समाजमाध्यमांमध्ये ट्रोल करण्यात येत आहे. त्यापार्श्वभुमीवर त्यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला.

‘अपघाताच्या वेळी मी गाडीत नव्हते. पहाटे पाचच्या सुमारास अपघात झाला. दुपारी ही बातमी मला समजली. त्यानंतर लगेचच मी अपघातग्रस्तांच्या कुटुंबाला मदतीचा हात पुढे केला. माझे मानलेले भाऊ आहेत, त्यांच्याकडून मी संबंधित रिक्षावाल्यांच्या कुटुंबीयांना मदतही पाठवली. मात्र, त्यांच्याकडून ही मदत नाकारण्यात आली,’ असे आरोप गौतमी पाटील यांनी केले.

‘या प्रकरणात कायदेशीर मार्गाने तपास सुरू आहे. जे काही होईल त्याला कायद्याच्या मार्गाने समोरे जायची माझी तयारी आहे,’ असेही पाटील यांनी सांगितले. ‘मी पोलिसांना पूर्ण सहकार्य केले आहे. गाडीची कागदपत्रे, चालकाचे तपशील, अपघात झाला तेव्हा मी कुठे होते? ही सगळी माहिती पोलिसांना दिली आहे. कायदेशीर मार्गाने ज्या गोष्टी करायच्या आहेत, त्या मी आता करते आहे,’ असेही गौतमी पाटील यांनी स्पष्ट केले.

…यामुळे अपघातग्रस्त कुटुंबियांच्या सांत्वनाला गेले नाही

‘मी त्या कुटुंबियांचे सांत्वन करायला गेले नाही, हे खरे आहे. माझे कार्यक्रम सुरू होते. समोरच्या माणसांनी मोठी गुंतवणुक केलेली असते. त्यामुळे मला काम सोडून जाता येत नाही. मात्र, मी माझ्या भावांना तिथे पाठविले होते. त्यांना ‘छान, छान’ उत्तरे दिली गेली. अशी उत्तरे मिळाल्यानंतर मी तिथे कशी काय जाणार ?’ असा सवालही गौतमी पाटील यांनी उपस्थित केला.

चालकाची चूक

‘मला चालकाने सांगितले की मी देवदर्शनासाठी गाडी घेऊन जातो. माझ्या परवानगीने तो गाडी घेऊन गेला. त्यानंतर माझा त्याच्याशी संपर्क झाला नाही. अपघात झाला ती त्याची चूक होती. गाडी घेऊन गेल्यानंतर ती जबाबदारी त्याची होती. आता मी त्याच्याशी संपर्क ठेवलेला नाही,’ असे पाटील म्हणाल्या.

चंद्रकांत पाटील यांना हे प्रकरण माहीत नसावे

या प्रकरणात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधत ‘गौतमीला कधी अटक करणार’ अशी विचारणा केली होती. त्यावर प्रत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गौतमी पाटील म्हणाल्या,‘कदाचित चंद्रकांत दादांना हे प्रकरण माहीत नसेल, म्हणून ते तसे बोलले. मात्र, त्यांना पोलिसांनी विषय समजावून सांगितला. त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाची आभारी आहे.’